संग्रहित छायाचित्र
शहरातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघातून अखेरच्या दिवसापर्यंत ८९ उमेदवारांचे ११५ अर्ज दाखल झाले आहेत. पाच दिवसांत चारही मतदारसंघातून एकूण २४६ जणांनी अर्ज नेले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी कालचा शेवटचा दिवस होता. आजपासून अर्ज छाननीला सुरुवात होणार आहे. सोमवार (दि.०४) पर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेता येणार आहेत.
शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज करण्याची मंगळवारी (दि. २९) शेवटच्या मुदत संपली आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी भोसरीत महायुतीतून महेश लांडगे, अपक्ष रवी लांडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर चिंचवडमधून मविआकडून राहुल कलाटे, अपक्ष नाना काटे, मोरेश्वर भोंडवे, भाऊसाहेब भोईर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच पिंपरीतून मविआकडून सुलक्षणा शिलवंत, स्वराज्य पक्षाकडून बाळासाहेब ओव्हाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच विधानसभा मतदासंघातून महायुती, मविआ आणि अपक्षाकडून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिका-यांनी बुधवारी (दि. ३०) सर्व अर्जाची छाननी होणार आहे. तर सोमवार दि. ४ नोव्हेंबरला उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याची मुदत देण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना जारी झाली. प्रत्येक मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले गेले. उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात उमेदवारांच्या फक्त तीन वाहनांना प्रवेश आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना देखील उमेदवारासह फक्त पाचजणांना प्रवेश देण्यात आला. या परिसरात मिरवणूक, सभा घेण्यास तसेच कोणत्याही प्रकारची घोषणा, वाद्ये वाजविण्यास प्रतिबंध आहे.
अखेरचा दिवस असल्याने गर्दी
पिंपरी विधानसभेत मंगळवारी (दि. २९) एकूण ३९ उमेदवारांनी ४५ अर्ज दाखल केले आहेत. अखेरच्या दिवशी ३० उमेदवारांनी ३३ अर्ज दाखल केले. मावळ विधानसभा मतदारसंघातून १८ उमेदवारांनी २६ अर्ज दाखल केले आहेत. ८ उमेदवारांनी ८ अर्ज दाखल केले आहेत. चिंचवड विधानसभा मतदासंघातून एकूण ३२ उमेदवारांनी ४४ अर्ज दाखल केले आहेत. १९ उमेदवारांनी २६ अर्ज दाखल केली आहेत.