संग्रहित छायाचित्र
मुंबई : मुंबईत ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. रवी राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रवी राजा हे काँग्रेसमध्ये होते. सायन कोळीवाडा (Sion Koliwada) या ठिकाणाहून त्यांना तिकिट हवे होते. मात्र काँग्रेसने गणेश यादव यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले रवी राजा यांनी गुरुवारी (दि.३१ ऑक्टोबर) भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
रवी राजा (Ravi Raja) यांनी मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद भुषवले आहे. आपल्याला सलग दोनदा डावलले गेले आहे त्यामुळे आपण काँग्रेसला सोडचिठ्ठी देत असल्याचे रवी राजा यांनी म्हटले आहे. रवी राजा तीन दशकांहून अधिक काळ काँग्रेसमध्ये होते. ऐन विधानसभेच्या तोंडावर रवी राजा यांनी काँग्रेसला हात दाखवत कमळ हाती घेतले असून त्यांच्याबरोबरच बाबू दरेकर या शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षातले नेते भाजपमध्ये आले आहेत.
आणखी एक विरोधीपक्ष नेता भाजपमध्ये
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवी राजा यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने मुंबई काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. विधानसभेचे विरोधीपक्ष नेतेपद भूषवलेल्या मधुकरराव पिचड, नारायण राणे यांच्यापासून एकनाथ खडसे, राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षांतर केल्याच्या परंपरेत आता माजी नगरसेवक आणि महापालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते रवी राजा यांची भर पडली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या (BJP) कॅप्टन तमिळसेल्वनकडून १४ हजार मतांच्या फरकाने पराभूत होऊनही गणेश यादव यांना काँग्रेसने तिकीट दिले आहे. रवी राजा सायन-कोळीवाड्यात प्रसिद्ध आहेत. त्यांनी काँग्रेस सोडल्यामुळे पक्षाचा विशेषत: तमिळ आणि मराठी मतदारांमध्ये असलेला पाठिंबा कमी होईल. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने अँटी इन्कम्बन्सीचा सामना करणाऱ्या कॅप्टन तमिळसेल्वन यांना बळ मिळणार आहे.
येणाऱ्यांची यादी बरीच मोठी
पुढच्या काळात काँग्रेसचे प्रमुख लोक रवी राजांच्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ही नावे आज विचारू नका.ही यादी खूप मोठी आहे. प्रवेश होईल तेव्हाच त्यांची नावे कळतीलच. पालिकेत आणि मुंबई शहरात ज्यांनी काँग्रेस टिकवून ठेवली त्यापैकी रवी राजा आहेत. रवी राजा यांचे कार्यक्षेत्र मोठे आहे. सायनमध्ये त्यांचे काम मोठे आहे. त्यामुळे आमचे उमेदवार आर. तमिल सेल्वन यांना फायदाच होणार असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली आहे. रवी राजा यांच्यासारखा मातब्बर नेता, ज्यांनी पालिका गाजवली, मावळत्या महापालिकेचे विरोधी पक्षनेते होते. आक्रमक भूमिका मांडणारे नेते. पाच टर्म महापालिकेत निवडून आले. एक विक्रम त्यांच्या नावाने आहे, २३ वर्षे त्यांनी बेस्टचे सदस्य म्हणून काम केए आहे. बेस्ट संदर्भात पालिकेत रवी राजा यांच्याकडे ऑथेरिटी म्हणून बघितले जाते. जनसंपर्क असलेला हा नेता. काँग्रेस नेत्यांशी त्यांचा कनेक्ट आहे. आम्हाला रवी राजा यांचा फायदा होईल, त्यांच्या माध्यमातून आमच्या संपर्कात अनेक लोक येत असल्याचेही फडणवीसांनी नमूद केले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.