चंद्रकांत दादा काही केल्या माध्यमांशी बोलेना
चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यातील सर्किट हाऊस येथे पालकमंत्री म्हणून विविध प्रश्नांसंदर्भात शेवटची आढावा बैठक घेतली. मात्र, या बैठकीनंतर माध्यमांशी न बोलताच चंद्रकात पाटील निघून गेले. त्यामुळे, चर्चांना उधाण आले आहे.
पालकमंत्री म्हणून घेतलेल्या शेवटच्या आढावा बैठकीनंतर पुन्हा माध्यमांशी न बोलता चंद्रकांत पाटील निघाले. यावेळी चंद्रकात पाटील यांना तुम्ही आमच्याशी का बोलत नाही? असा प्रश्न करण्यात आला. यावर चंद्रकात पाटील यांनी माझा तुमच्यावर राग नाही... वेळोवेळी घडलेल्या घटनांमुळे मला हा निर्णय घ्यावा लागला, अशी कबुली दिली.
दरम्यान, मागील काही महिन्यांपासून चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री असून सगळ्या बैठका अजित पवार घेत असल्याचं दिसत होतं. अजित पवार मागील अनेक वर्षांपासून पुण्यात काम करत आहेत. पुणे जिल्ह्याची संपूर्ण माहिती देखील अजित पवार यांना आहे. यापूर्वीदेखील कोरोनाकाळात अजित पवार पुण्याचे पालकमंत्री होते. त्यावेळी पुणे शहरात त्यांनी चांगली कामगिरी पार पाडली होती. त्यामुळे अनेकांकडून अजित पवारांना पालकमंत्री करा, अशा प्रतिक्रिया येत होत्या.
शिवाय अजित पवारांना तुम्हीच सुपर पालकमंत्री असल्यासारखे वागत असल्याचा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी पालकमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली होती. अखेर बुधवारी अजित पवार यांची पुण्याच्या पालकमंत्री पदी वर्णी लागली. त्यामुळे, आज पुण्यात पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांनी शेवटची बैठक घेतली.