गोपीचंद पडळकरांची मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करणार : राष्ट्रवादी काँग्रेस
विधान परिषदेचे आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यभरात राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पडळकर यांच्या याच वक्तव्याच्या विरोधात पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तसेच पडळकारांची मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने सांगितले.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाबत केल्याने वक्तव्याने राज्यात उलट सुलट राजकीय चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पडळकर यांच्या विरोधात चांगलीच आक्रमक झाली आहे. पुणे राष्ट्रवादीकडून सोमवारी पडळकर यांचा निषेध करण्यात आला. याबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते भैयासाहेब जाधव म्हणाले की, ''अप्रगल्भ व्यक्तीच्या तोंडून अप्रगल्भ वक्तव्येच बाहेर पडणार. पडळकर यांची राजकीय परीपक्वता महाराष्ट्राला कधीही दिसून आली नाही. ते नेहमीच अशा प्रकारची विधाने करताना दिसून येतात. त्यामुळे पडळकरांच्या अप्रगल्भ वक्तव्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. पडळकर यांच्या विरोधात शहराध्यक्ष दीपक मानकर यांनीही निषेध करुन त्यांना सुधारण्याचा इशारा दिला आहे. आमचे शहराध्यक्ष जो बोलते है वो करते है.
त्यामुळे पडळकर यांनी पुणे शहरात येताना आता विचार करून यावा. पडळकर यांनी आपल्या बुद्धीला झेपतील, अशीच वक्तव्ये करावीत. पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणाला गालबोट लागणार नाही, याची देखील काळजी पडळकर यांनी घ्यावी. पडळकर यांना मानसोपचार तज्ञाची गरज आहे. त्यांना लवकरात लवककर येरवडा येथील मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्न करेल.'' पडळकरांच्या भ्रष्ट बुध्दीला गणरायाने सद्बुद्धी द्यावी, अशी प्रार्थना केली असल्याचेही जाधव यांनी सीवीक मिररशी बोलताना सांगितले.
दरम्यान 'अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे' अशी टीका पडळकर यांनी केली होती. त्यामुळे राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे.
पडळकर दिसतील तिथे चोप देणार...
पुण्यातील अजित पवारांचे समर्थक यांनी पुणे-मुंबई महामार्गावरील सोमटने फाटा येथे आंदोलन केले. तसेच पडळकर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले. वेळोवेळी विनाकारण अजित पवारांवर भाष्य करणाऱ्या पडळकरांना पुणे जिल्ह्यात फिरू देणार नाही, आता पडळकरांनी माफी मागितली तरी दिली जाणार नाही, ते दिसतील तिथं त्यांना आम्ही चोप देऊ अशी आक्रमक भूमिका अजित पवारांच्या समर्थकांनी घेतली आहे. त्यामुळे आता चांगलेच राजकीय नाट्य रंगणार असल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यावर गोपीचंद पडाळकर सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. पडळकरांनी अतिशय गलिच्छ वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्याकडे लक्ष देणार नाही. कुजत्या मनाची ही माणसं आहेत. त्यांच्याकडून चांगलेपणाची आपेक्षा करणे हे मुर्ख पणाचे ठरेल. त्यांचे राजकारण केवळ पवार कुंटूबीयांवर टीका करण्यात चालले आहे. भाजपकडून त्याचा हत्यार म्हणून वापर केला जातोय. अजित पवार आता सरकारमध्ये एकत्र काम करत आहेत. पडळकरांनी केलेले वक्तव्य देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मान्य आहे का ? याचा दोघांनी खुलासा करावा. अजित पवारांनी अशा वक्तव्याबाबत गंभीर विचार करायला हवा. मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्याकडूनही शरद पवारांवर टीका केली जाते. त्याविरोधात जर अजित पवार गटाने आंदोलन केले तर त्यांच्यासोबत आम्ही देखील सहभागी होऊ.
- अंकुश काकडे, प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)