राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगतापांच्या भावाला जीवे मारण्याची धमकी
पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या भावाला गोळीबार करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी तडीपार आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे. वानवडी पोलीसांनी ही कारवाई केली आहे.
श्रीधर ऊर्फ सोन्या विठ्ठल शेलार (वय ३५, रा. शांतीनगर, स.नं. ५४/९ब, वानवडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने प्रशांत जगताप यांचे भाऊ अभिजीत जगताप यांना गोळीबार करत जीवे मारण्याची दिली होती.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोन्याला कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हा कार्यक्षेत्रातून ०२ वर्षाकरीता तडीपार करण्यात आले होते. मात्र, कोणाचीही पुर्वपरवानगी न घेता बेकायदेशीररित्या पुण्यात तो आला होता. त्यानंतर फोनवरून प्रशांत जगताप यांच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
धमकीनंतर वानवडी परिसरात सोन्या दारूच्या नशेत धारदार हत्यारासह फिरत असल्याची माहिती पोलीसांनी खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी सापळा रचून श्रीधर ऊर्फ सोन्या यास ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकऱणाचा अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत.