केंद्र सरकार विणकर, हातमाग व्यावसायिकांसाठी सकारात्मक - मेधा कुलकर्णी

'लोकल फॉर ग्लोबल'ला प्रोत्साहन दिल्याने देशभरातील छोटे व्यावसायिक सक्षम होत आहेत," असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा माजी आमदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 12 Sep 2023
  • 11:42 am
 Medha Kulkarni  : केंद्र सरकार विणकर, हातमाग व्यावसायिकांसाठी सकारात्मक - मेधा कुलकर्णी

केंद्र सरकार विणकर, हातमाग व्यावसायिकांसाठी सकारात्मक - मेधा कुलकर्णी

इंडियन सिल्क गॅलरीतर्फे पुणेकरांसाठी १७ सप्टेंबरपर्यंत भव्य हॅन्डलूम प्रदर्शन

"केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालय, लघु व मध्यम उद्योग आणि खादी ग्रामोद्योग विभागाच्या माध्यमातून विणकर, हातमाग व्यावसायिक यांच्यासाठी अनेक योजना आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अमृतकालामध्ये स्वदेशी, तसेच 'लोकल फॉर ग्लोबल'ला प्रोत्साहन दिल्याने देशभरातील छोटे व्यावसायिक सक्षम होत आहेत," असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा माजी आमदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले. देशभरातील विणकरांची कलाकुसर पाहण्याची, तसेच त्यांच्या कलेला दाद देण्याची संधी पुणेकरांना असल्याचेही त्यांनी नमूद केले.

केंद्र सरकारच्या अमृतकाल संकल्पनेअंतर्गत विणकर कामगारांना, हातमाग व्यावसायिकांना आणि हातमागावरील कपड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन सिल्क गॅलरीतर्फे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय संचालित हातमाग विकास आयुक्तालयाच्या सहकार्याने आयोजित 'माय प्राईड, माय हॅन्डलूम' या भव्य हातमाग प्रदर्शनाचे (बिगेस्ट हॅन्डलूम एक्झिबिशन) उद्घाटन प्रा. डॉ. कुलकर्णी यांनी केले. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सेंट्रल सिल्क बोर्डाचे उपसंचालक (नि.) श्रीनिवास राव, स्तंभलेखिका शेफाली वैद्य आदी उपस्थित होते. महाराष्ट्रासह अन्य १४ राज्यांतील ६० पेक्षा अधिक हातमाग व्यावसायिक व विणकरांनी यात सहभाग घेतला आहे. सिद्धी बँक्वेट, डीपी रस्ता, म्हात्रे पुलाजवळ, कर्वेनगर पुणे येथे १७ सप्टेंबर २०२३ पर्यंत सकाळी ११ ते ८ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले आहे.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, "देशाच्या विविध भागात असलेली विशेषता हातमाग, कॉटन, सिल्क, लिनन या कपड्यांच्या माध्यमातून पुणेकरांसमोर ठेवण्याचा प्रयत्न आहे. अतिशय सुंदर कलाकुसर, नक्षी आणि गुणवत्तापूर्ण कपडे उपलब्ध आहेत. गणेशोत्सव, नवरात्र महोत्सव आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर होत असलेले हे प्रदर्शन पुणेकर, विशेषतः महिलांसाठी ही एक अनोखी पर्वणी आहे. चोखंदळ व हौशी पुणेकर या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा वाटते."

श्रीनिवास राव म्हणाले, "देशभरातील विणकर कामगारांनी केलेली कलाकुसर एकत्रितपणे पुणेकरांसमोर ठेवण्याचा प्रयत्न आहे. महिला वर्गाच्या सौंदर्यात आणि आकर्षणात भर घालणारे पुण्यातील हे तिसरे प्रदर्शन आहे. कुशल कारागिरांच्या हाताने विणलेल्या कपड्यावर सुंदर आणि मोहक नक्षीदार काम झाले आहे. रेशमी वस्त्रांची फारशी ओळख ग्राहकांना नसते. ग्राहकांना शुद्ध आणि हाताने विणकाम केलेल्या साड्या, ड्रेस मटेरियल्स व अन्य कपडे या प्रदर्शनात उपलब्ध करून दिले आहेत."

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest