भाजपकडून कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर आणि भोसरी मतदारसंघातून विद्यमान आमदारांना पुन्हा संधी, बंडखोरी टाळण्याचे आव्हान

कोथरूड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांना, शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे, तर पर्वतीमधून माधुरी मिसाळ यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे, तर भोसरीमधून महेश लांडगे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारी घोषित करण्याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे. महायुतीतील भाजपने राज्यातील उमेदवारांची ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत कोथरूड, शिवाजीनगर, पर्वती, भोसरी या मतदारसंघात विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

शहरातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांना, शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे, तर पर्वतीमधून माधुरी मिसाळ यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे, तर भोसरीमधून महेश लांडगे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अपेक्षेप्रमाणे चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाकरी फिरवत शंकर जगताप यांना संधी देण्यात आली आहे.

कोथरुडमधून २०१९ मध्ये चंद्रकांत पाटील निवडून आले होते. पाटील यांच्याविरोधात नाराजी असूनही पुन्हा त्यांना संधी देण्यात आली. शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना पक्षातूनच विरोध होता. मात्र, तो डावलून भाजपने शिरोळे यांच्यावरच पुन्हा विश्वास दर्शवला. पर्वती येथून श्रीनाथ भिमाले भाजपकडून इच्छुक होते. त्यामुळे मिसाळ यांना कसब्यातून तिकीट मिळेल, अशीही चर्चा होती. मात्र, पक्षाने भिमाले यांचा विचार न करता सलग चौथ्यांदा मिसाळ यांनाच तिकीट दिले. याचबरोबर चिंचवड मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे भाकरी फिरवत नव्या उमेदवाराला संधी देण्यात आली. पर्वती आणि चिंचवड मतदारसंघासह इतर इच्छुक उमेदवारांच्या बंडखोरी टाळण्याचे आव्हान भाजपपुढे आहे.

भाजपकडून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार पहिल्या यादीत याची झलक दिसून आली आहे. अनेक नव्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे, तर काही ठिकाणी विद्यमान आमदारांचं तिकीट कापण्यात आलं आहे. असे एकूण राज्यातील पहिल्या यादीत दिसून येत असले तरी ज्या पक्षाचा उमेदवार त्या पक्षाला उमेदवारी तसेच ज्या उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता त्याला तिकीट असे एकूण सूत्र महायुतीने ठरवले आहे.

पर्वती मतदारसंघातून पुन्हा माधुरी मिसाळ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, पण याच मतदारसंघातून माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी उमेदवारीवर दावा केला होता. त्यांची महामंडळावर नियुक्ती देऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न भाजपने केला होता. परंतु भिमाले यांना महामंडळ पसंत नसून पर्वतीतून उमेदवारी हवी होती. आता मिसाळ यांना उमेदवारी दिल्याने भिमाले यांच्या नाराजीचा सामना भाजपला करावा लागणार आहे. दुसरीकडे भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी कोथरूडमधून पाटील यांच्या उमेदवारीला आव्हान देत आपल्याला संधी मिळावी, अशी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली होती. मात्र आता पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यामुळे बालवडकर नेमकी काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारी यादीनुसार, चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी विधानसभा मतदारसंघातून तिकीट जाहीर झाले आहे, तर देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिममधून उमेदवारी जाहीर झाली आहे. नंदूरबारमधून विजयकुमार गावित यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. धुळे शहरमधून अनुप अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शिंदखेडामधून जयकुमार रावल यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे.

शिरपूरमधून काशीराम पावरा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर अमोल जावळे यांना रावेर, संजय सावकारे यांना भुसावळ, सुरशे भोळे यांना जळगाव, मंगेश चव्हाण यांना पुन्हा एकदा चाळीसगावातून, गिरीश महाजन यांना जामनेर, आकाश फुंडकर यांना खामगाव, संजय कुटे यांना जळगाव (जामोद), रणधीर सावरकर यांना अकोला पूर्व, प्रताप अडसद यांना धामगाव रेल्वे, प्रवीण तायडे यांना अचलपूर, राजेश बकाणे यांना देवळी, समीर कुणावर यांना हिंगणघाट, तर डोंबिवलीमधून रवींद्र चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे.

भाजपाच्या पहिल्या यादीत पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवार
दौंड : ॲड. राहुल कुल, चिंचवड : शंकर जगताप, भोसरी : महेश लांडगे, शिवाजीनगर : सिद्धार्थ शिरोळे,  कोथरूड : चंद्रकांत पाटील, पर्वती : माधुरी मिसाळ, सोलापूर उत्तर : विजयकुमार देशमुख, अक्कलकोट : सचिन कल्याणशेट्टी, सोलापूर, दक्षिण : सुभाष देशमुख, मान : जयकुमार गोरे, कराड दक्षिण : डॉ. अतुल भोसले, सातारा : छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, कोल्हापूर दक्षिण : अमल महाडिक, इचलकरंजी : राहुल आवाडे, मिरज : सुरेश खाडे, सांगली : सुधीर गाडगीळ

शिरोळे यांना निवडणूक नाही सोपी
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना पुन्हा एकदा भाजपने संधी दिली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवाजीनगर  मतदारसंघातून भाजपला अवच्या काही हजार मतांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे या ठिकाणी उमेदवार बदलणार असल्याची चर्चा होती. असे असताना भाजपने पुन्हा एकदा सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर विश्वास दाखवला आहे. शिरोळे यांना ही निवडणूक सोपी नाही. त्यांच्या विरोधात कॉंग्रेस पक्षातून दत्ता बहिरट, सनी निम्हण, मनीष आनंद, दिप्ती चवधरी आदींनी तयारी सुरु केली आहे. यांच्यापैकी कोणालाही तिकीट मिळाले तरी ही निवडणूक शिरोळे यांना जड जाणार आहे. तसेच भाजपमधून त्यांना अंतर्गत विरोध असल्याचेही बोलले जात आहे.  

कसबा, कॅन्टोन्मेंट, खडकवासला येथील उमेदवार गॅसवर 
शहरातील विद्यमान आमदारांसह कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट, खडकवासला या मतदारसंघांवर भाजपचा दावा आहे. परंतु या मतदारसंघात अद्याप उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे या मतदारसंघातील विद्यमान आमदार गॅसवर असल्याचे दिसून येत आहे. लोकसभेला ज्या मतदारसंघातून कमी मते मिळाले आहेत, त्या मतदारसंघात भाकरी फिरवण्याचा इशारा भाजपने दिला होता. त्यानुसार पाहिले तर पुणे कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर मतदारसंघात भाजपला फटका बसला होता. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवारी बदलले जातील, अशी चर्चा होती. परंतु शिवाजीनगरमधून पुन्हा शिरोळे यांना संधी देण्यात आली आहे. आता पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात काय होणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

कसब्यातून कोण?
कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार असणार आहेत. मात्र या मतदारसंघातील अद्याप तिढा सुटलेला दिसून येत आहे. कसबा मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी आहे, तर खडकवासला आणि पुणे कॅन्टोन्मेंट या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार आहेत. मात्र पक्षांतर्गत त्यांना उमेदवारी देण्यावरून विरोध आहे. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात ब्राह्मण उमेदवार द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. अशा परिस्थितीत पोटनिवडणूक लढलेले हेमंत रासने यांना भाजप पुन्हा निवडणूक रिंगणात उतरणार की धीरज घाटे अथवा इतर ब्राह्मण चेहरा भाजप पुढे करणार हे येत्या काळात दिसून येईल.

नाराज श्रीनाथ भिमाले बंडखोरी करणार?
पर्वती विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवाराची मागणी केली होती. तिकीट मिळेल याची खात्री होती, पण पक्षाने तिकीट दिले नसल्याने नाराजी आहे. कार्यकर्त्यांसोबत आणि मतदारांशी बोलून पुढील निर्णय घेतला जाईल. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणखी वेळ आहे. त्यामुळे पुढील दिशा ठरवल्यानंतर माझा निर्णय जाहीर करणार आहे. असे नाराज श्रीनाथ भिमाले यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले.  माधुरी मिसाळ यांचा प्रचार करणार का, असे विचारले असता, त्यांनी उत्तर देण्यापेक्षा कार्यकर्त्यांशी बोलणार असून उमेदवारी अर्ज भरण्यास वेळ असल्याचे सांगत एकप्रकारे मिसाळ यांच्याविरोधात बंडखोरी करण्याचे संकेत दिले. त्यामुळे आता भाजपकडून कोणता निर्णय घेतला जाणार तसेच भिमाले यांची नाराजी कशी दूर केली जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून या मतदारसंघामध्ये आश्‍विनी कदम इच्छुक आहेत.

कोथरुडमधील मताधिक्य कायम राहणार की कमी होणार? 
कोथरुड मतदारसंघातून मेधा कुलकर्णी यांनी २०१४ मध्ये निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना एक लाखाचे मताधिक्य होते. त्यानंतर २०१९ ला त्यांना उमेदवारी नाकारत चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली. त्यांचे मताधिक्य ५० हजाराने घसरले. यंदाच्या म्हणजेच २०२४ च्या निवडणुकीत पाटील यांच्या विरोधात भाजपचेच अमोल बालवडकर यांनी थंड थोपटले होते. त्यांनी प्रचारदेखील सुरु केला होता. आता पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने बालवडकर यांची नाराजी दूर करण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. पाटील यांच्या विरोधात उध्दव ठाकरे शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार किंवा चंद्रकात मोकाटे यांचे कडवे आव्हान असणार आहे. त्यामुळे पाटील यांना निवडणूक सोपी नसल्याचे बोलले जात आहे. ते निवडूने आले तरी मताधिक्य तेवढेच राहणार की घटणार, याकडेही लक्ष असणार आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest