पुण्यात मोठी खांदेपालट, भाजपच्या शहराध्यपदी धीरज घाटे यांची नियुक्ती
पुणे शहर भाजपमध्ये मोठी खांदेपालट करण्यात आली आहे. भाजपच्या पुणे शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांची निवड करण्यात आली आहे. आज सकाळी प्रदेश कार्यालयाकडून शहराध्यक्ष पदी माजी सभागृह नेते धीरज घाटे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. तर पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्षपदी शकर जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून धीरज घाटे यांचे नाव शहराध्यक्ष पदासाठी चर्चेत होते आणि कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याकडून ही देखील घाटे यांचे नाव अंतिम झाल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे आज घाटे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. दरम्यान, माजी आमदार जगदीश मुळीक यांची शहराध्यक्षपदाची मुदत उलटून जवळपास एक वर्ष होऊन गेले होते. त्यामुळे शहराध्यक्ष बदलाच्या चर्चा सुरू होत्या.
अशातच शहराध्यक्ष पदासाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, धीरज घाटे, श्रीनाथ भिमाले यांच्यासह इतर काही जण इच्छुक होते. आज सकाळी प्रदेश कार्यालयाकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या निवडीची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पुणे शहराध्यपदी धीरज घाटे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदी शंकर जगताप तर पुणे ग्रामीणसाठी वासूदेव काळे आणि मावळसाठी शरद बुट्टे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.