राष्ट्रवादीकडून गद्दार दिवस साजरा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीकडून राज्यभरात गद्दार दिवस म्हणून साजरा केला जात आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकातही राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी ५० खोके माजलेत बोके, अशा प्रकारची घोषणाबाजी करण्यात आली आहे.
या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, बाळासाहेब बोडके, उदय महाले, राजु साने, प्रदीप गायकवाड़, किशोर कांबळे, विक्रम जाधव, अर्चना कांबळे, मृणालिनी वाणी, सुषमा सातपुते, महेश हांडे, राकेश कामठे, अजिंक्य पालकर, मनोज पाचपुते, दीपक कामठे, स्वप्निल जोशी, केतन ओरसे, रोहन पायगुडे, पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, विधानसभा अध्यक्ष, कार्याध्यक्ष व सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रशांत जगताप म्हणाले की, “देशातील जनतेने आज पर्यंतच्या ७५ वर्षाच्या काळात अनेक राजकीय घडामोडी पाहिल्या आहेत. पण एक वर्षापूर्वी ठाकरे गटातून एकनाथ शिंदे यांनी ५० आमदारसह बाहेर पडत बंड पुकारले. त्यानंतर सूरत, गुवाहाटी आणि गोवामार्गे पुन्हा महाराष्ट्रामध्ये येत भाजपसोबत नव्याने सरकार स्थापन केले. त्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होता आले आहे. हे बंड देशातील जनता कधीच विसरू शकणार नाही. या बंडखोर आमदारांना ५० खोके दिल्याची चर्चा आहे. त्या घटनेचा आणि कृतीचा आम्ही अनोख्या प्रकारे निषेध नोंदवित आहे. तो म्हणजे गद्दार दिवस साजरा करित आहोत.”