संग्रहित छायाचित्र
यंदाच्या निवडणुकीत कोणता उमेदवार निवडून येणार, सगळ्यात जास्त जागा महाविकास आघाडीला मिळणार की महायुतीला मिळणार, या प्रश्नाची जशी उत्सुकता आहे त्यापेक्षा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीतील कोणते पक्ष महायुतीत जाणार अथवा महायुतीतील कोणता पक्ष सत्तेसाठी महाविकास आघाडीत सहभागी होणार याबद्दलची उत्सुकता मनात निर्माण झाली आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुका या विविध कारणांमुळे संस्मरणीय ठरणार आहेत. निवडणूक लढवणाऱ्यांना इतके मुबलक पर्याय उपलब्ध करून देणारी निवडणूक म्हणून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीचा उल्लेख करून द्यावा लागेल. तीन पक्षांच्या दोन आघाड्या आणि स्वराज्य, वंचित, मनसे, बसपा यासारखे पर्याय नाही आवडले तर अपक्ष म्हणून उभे राहण्याची संधी देणारी ही निवडणूक आहे. मतदानाला केवळ ५ दिवस बाकी आहेत. २३ नोव्हेंबरला निकाल समोर येईल. निकालानंतर खरी मजा येणार आहे. प्रत्येक पक्षाचे काही बंडखोर निवडून येतील. कारण महाविकास आघाडी आणि महायुतीत सक्षम पक्षांनी आपल्याच मित्र पक्षांच्या उमेदवाराच्या विरोधात काही सक्षम बंडखोर उभे केले आहेत. यदाकदाचित जातीय समीकरणाचा फटका बसून अपक्ष उभा राहिलेला बंडखोर निवडून आला तर त्याला आपल्यात घ्यायला हे राष्ट्रीय पक्ष तयार असणारच. निकालानंतर सत्तास्थापनेसाठी कोण पुढे येणार याबाबत व्यक्त केलेले हे काही अंदाज अथवा पर्याय आहेत. अर्थात या केवळ शक्यता आहेत.
लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका लक्षात घेत भाजपने आपल्या प्रचारात काही सुधारणा केलेल्या दिसतात. या विधानसभेच्या प्रचारात भाजपचे नेते आपल्या सरकारने राबवलेल्या योजना जनतेसमोर मोठ्या आक्रमकपणे सांगताना दिसत आहेत. तसेच विरोधकांच्या प्रचारात केलेल्या आरोपांना जशास तसे उत्तर देताना दिसत आहेत. हा प्रकार लोकसभेच्या प्रचारात दिसत नव्हता, हे आवर्जून नोंदवावे लागेल. तरीही भाजपच्या गोटात यशाबद्दल फारशी खात्री नाही, ही बाब निराळी.
कडबोळ्यांचे सरकार सत्तेवर येण्यापेक्षा एकहाती सत्ता असावी या विचारातून भाजपला राज्यात सगळ्यात जास्त जागा मिळण्याची शक्यता वाटते. मागच्या विधानसभेत भाजपला १०५ आमदार होते. यावेळी ही संख्या १२० वर जाण्याची शक्यता आहे. उर्वरित जागा शिंदे यांची शिवसेना भरून काढेल आणि महाराष्ट्रात भाजप-सेनेची सत्ता येईल. या उर्वरित जागा उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही भरून काढू शकते, तशी तयारी त्यांनी दाखवलेली असणारच! जर भाजपला १४५ जागांची जादुई फिगर गाठण्यासाठी शिंदे तयार झाले नाहीत अथवा मुख्यमंत्रिपदासाठी आडून बसले तर उर्वरित जागा शरद पवारांच्या तुतारीकडून पुरवल्या जातील. (अशी कामगिरी पवारांनी मनोहर जोशी यांच्या सरकारसाठी केलेली होती) त्यासाठी मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस सोडून कोणालाही बसवण्याची अट पवार भाजपासमोर ठेवतील. भाजपला शरद पवारांचे उरलेसुरले उपद्रवमूल्य संपवायचे असेल तर फडणवीसांना मुख्यमंत्रिपदी बसवणे अनिवार्य आहे. भाजपमधील काही नेत्यांनी जोर धरला तर आणि तरच फडणवीस वगळून नेतेपदाचा बहुमान इतर नेत्याकडे जाईल. अर्थात उरलेल्या जागा देण्याची संधी काकांना देण्यापेक्षा आपणच ती घेतली तर आपण पुन्हा उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होऊ शकतो, याचा विश्वास अजित पवारांना असणारच.
आता जरा याच्या उलट शक्यता लक्षात घेता येईल. समजा महाविकास आघाडीच्या दाव्यानुसार जनता महायुतीला कंटाळलेली आहे. तिने शंभर-सव्वाशे जागा काँग्रेस आणि उबाठाच्या पदरात टाकल्या तर उर्वरित जागा शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांकडून भरून काढल्या जातील. भाजपला सत्तेपासून बाजूला ठेवण्यात शरद पवार माहीर आहेत. भाजप सोडून उरलेल्या बहुतांश पक्षांची मोट बांधली तर शरद पवार हे जयंत पाटील यांना एखाद्या वर्षासाठी मुख्यमंत्रिपद देऊ शकतात. दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी आणि एक काँग्रेस अशी मोट बांधणे शरद पवारांसाठी काहीही अवघड नाही.
यात आणखी काही शक्यता जोडता येतील. काँग्रेसला जर भाजपविरोधाचा लाभ होऊन शंभरी गाठता आली तर उर्वरित जागांची बेगमी करण्यासाठी ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंना पाचारण करतील. इतिहासात घडले नव्हते असे काँग्रेस-शिवसेनेचे सरकार सत्तेवर येईल. मात्र शरद पवार ही संधी कशाला सोडतील? यापेक्षा ते तुतारी आणि घड्याळ हातावर बांधून सरकार स्थापन करतील. आम्ही खरे नैसर्गिक मित्रपक्ष असल्याचे सांगायलाही ते विसरणार नाहीत.