दिल्ली भारताची राजधानी का राहावी? शशी थरूर यांचा प्रश्न; वर्षानुवर्ष प्रदूषण नियंत्रण करण्यात प्रशासन ठरतेय अपयशी

खासदार शशी थरूर यांनी दिल्ली हे शहर भारताची राष्ट्रीय राजधानी राहावी का, असा प्रश्न दिल्लीच्या वायुप्रदूषणाच्या पाश्वभूमीवर उपस्थित केला आहे. देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील वायुप्रदूषण ही एक गंभीर समस्या बनली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 19 Nov 2024
  • 07:10 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

दिल्ली : खासदार शशी थरूर यांनी दिल्ली हे शहर भारताची राष्ट्रीय राजधानी राहावी का, असा प्रश्न दिल्लीच्या वायुप्रदूषणाच्या पाश्वभूमीवर उपस्थित केला आहे. देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील वायुप्रदूषण ही एक गंभीर समस्या बनली आहे. हिवाळा सुरू होताच शहरातील हवेची गुणवत्ता विक्रमी ढासळली आहे. प्रचंड वाढलेल्या वायुप्रदूषणामुळे नागरिकांना शहरात राहणे जवळपास अशक्य बनत आहे.

दरम्यान दिल्ली सरकारने हवेच्या ढासळलेल्या गुणवत्तेला ‘मेडिकल एमर्जन्सी’ म्हटले आहे आणि नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन केले. इतकेच नाही तर खराब हवेमुळे दिल्ली-एनसीआरमधील शाळा आणि महाविद्यालये ही ऑनलाइन भरवली जात आहेत.

शशी थरूर केवळ हे मत मांडून थांबले नाहीत तर त्यांनी प्रदूषण नियंत्रणाबद्दल त्यांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती देखील यावेळी दिली. थरूर म्हणाले, “मी २०१५ पासून अनेक तज्ज्ञ, भागधारक यासह खासदारांसाठी एअर क्वालिटी राऊंड टेबल चर्चा घेतल्या, परंतु गेल्या वर्षापासून ते सोडून दिले आहे. कारण काहीही बदललेले दिसत नव्हते आणि कोणालाही काही फरक पडताना दिसला नाही. या शहरात नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्यांत वास्तव्य करणे शक्य नसते आणि उरलेल्या वर्षभरात जेमतेम राहता येऊ शकते. खरंच ही देशाची राजधानी राहावी का,” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

शशी थरूर यांनी जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांची यादी दिली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शशी थरूर यांनी यासंबंधी पोस्ट केली आहे. त्यांनी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) डेटाचा हवाला देत दिल्ली हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर असल्याचे म्हटले आहे. तसेच याबद्दल काहीच न केल्याचा ठपका त्यांनी सरकारवर ठेवला आहे.

“दिल्ली अधिकृतपणे जगातील सर्वांत प्रदूषित शहर आहे, चौपट धोकादायक पातळी आणि दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात प्रदूषित शहर, ढाकापेक्षा परिस्थिती जवळजवळ पाचपट वाईट आहे. आपले सरकार वर्षानुवर्षे ही भीषण परिस्थिती पाहात आहे आणि त्याबद्दल काहीही करत नाही, हे समजण्याच्या पलीकडचे आहे”.
--शशी थरूर, खासदार यांची ‘एक्स’ पोस्ट

गेल्या काही दिवसांपासून दिल्ली आणि एनसीआर या भागांमधील हवेची गुणवत्ता अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. या भागात राहाणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न तयार झाला आहे. दिल्लीत हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या केंद्रांना मंगळवारी सकाळी शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) हा ५०० अंकांपर्यंत गेल्याचे दिसून आले. शहरात गेल्या सात दिवसांपासून धुक्याचा दाट थर पाहायला मिळतो आहे. शहराचा एक्यूआय सोमवारी ४९४, रविवारी ४१४ आणि शनिवारी ४१७ इतका होता.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest