तुम्ही तुमच्या अधिकारांचा गैरवापर केला

उदयनिधी स्टॅलिन यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले, सनातन धर्माची डेंग्यू-मलेरियाशी तुलना महागात!

Youabusedyourrights

तुम्ही तुमच्या अधिकारांचा गैरवापर केला

सनातन धर्माची डेंग्यू-मलेरियाशी तुलना करून त्याच्या उच्चाटनासंदर्भात वक्तव्य करणाऱ्या स्टॅलिन यांनी यांनी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळताना न्यायालयाने त्यांना परखड शब्दांत सुनावले आहे. ‘तुम्ही तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा गैरवापर केल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याच्या अधिकाराचा दावा करताय,’ असा सवाल न्यायालयाने उदयनिधी स्टॅलिन यांना केला आहे.

उदयनिधी स्टॅलिन यांनी त्यांच्यावरील आरोपांना विरोध करणारी आणि कारवाईपासून संरक्षणासाठी दाद मागणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने स्टॅलिन यांना परखड शब्दांत फटकारले. न्यायमूर्ती संजीव खन्ना व न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. तुम्ही तुमच्या अधिकारांचा गैरवापर केला आहे... तुम्ही काय वक्तव्य केले ते तुम्हाला माहीत आहे. तुम्हाला परिणामांची जाणीव असायला हवी. तुम्ही मंत्री आहात, सामान्य व्यक्ती नाही, अशा शब्दांत न्यायालयाने उदयनिधी यांना फटकारले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ मार्च रोजी होईल, असेही न्यायालयाने यावेळी जाहीर केले.

वास्तविक, उदयनिधी यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर नोंदवलेल्या एफआयआर एकत्रित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. स्टॅलिन यांच्या वतीने न्यायालयात हजर झालेले अधिवक्ता अभिषेक मनू सिंघवी यांचे म्हणणे आहे की, उदयनिधी यांनी केलेल्या वक्तव्याचे ते स्वतःही  समर्थन करत नाहीत. स्टॅलिन यांच्या विरोधात ६ राज्यांमध्ये एफआयआर नोंदवले गेले आहेत आणि ते एकत्र करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी न्यायालयाने त्यांना संबंधित उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. सिंघवी पुढे म्हणाले की, 'मला ६ उच्च न्यायालयात जावे लागेल. यातच मी गुंतून राहील. खटला चालण्याआधीच हा त्रास सुरू होईल. सुनावणीदरम्यान सिंघवी यांनी पत्रकार अर्णब गोस्वामी, अमिश देवगण, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या नुपूर शर्मा आणि मोहम्मद जुबेर यांच्याशी संबंधित प्रकरणांचा वारंवार उल्लेख केला. सिंघवी यांनी वारंवार विनंती केल्यानंतर न्यायालयाने याचिकेवर विचार करण्याचे मान्य केले.

काय म्हटले आहे न्यायालयाने?

“तुम्ही राज्य घटनेच्या कलम १९(१)(अ) अंतर्गत मिळणाऱ्या अधिकारांचा गैरवापर केला. त्यांचा अवमान केला. आता तुम्ही कलम ३२ नुसार तुम्हाला मिळालेल्या दाद मागण्याच्या अधिकाराचा वापर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका करता? तुम्ही जे काही म्हणालात, त्याचे परिणाम काय होतील हे तुम्हाला माहिती नव्हतं का? तुम्ही कुणी सामान्य व्यक्ती नाही आहात. तुम्ही एक मंत्री आहात. तुम्हाला अशा गोष्टींच्या परिणामांची कल्पना असायला हवी”, अशा शब्दांत न्यायालयाने स्टॅलिन यांची कानउघाडणी केली.

काय म्हणाले होते उदयनिधी स्टॅलिन?

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या एका कार्यक्रमातील भाषणात उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी संबंधित विधान केलं होतं. तसेच, नंतर त्यांना अनेक प्रसंगी विचारणा केली असता आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचंही उदयनिधी स्टॅलिन यांनी स्पष्ट केलं होतं. “सनातन धर्म हा समानता आणि सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. त्यामुळे अशा गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्यांचं समूळ उच्चाटन करायला हवं. डास, डेंग्यू, मलेरिया आणि करोनासारख्या आजारांना विरोध करता येऊ शकत नाही. त्यांचं उच्चाटनच करायला हवं. त्याचप्रमाणे सनातन धर्माचंही उच्चाटन व्हायला हवं”, असं उदयनिधी स्टॅलिन म्हणाले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest