ओवेसींच्या विरोधात भाजपतर्फे महिला उमेदवार
#हैद्राबाद
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात १९५ उमेदवारांची नावे आहेत. तेलंगणातील हैद्राबादच्या जागेसाठी भाजपने डॉ. माधवी लता कोम्पेला यांना तिकीट दिले आहे. हैद्राबाद हा चर्चेतला मतदारसंघ आहे. कारण, एमआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसींयांचा हा बालेकिल्ला मानला जातो. २००४ पासून ते या मतदारसंघाचे सलग प्रतिनिधीत्व करत आहेत.
हैद्राबादच्या जागेवर १९८४ पासून ओवेसींकुटुंबीयांचा ताबा आहे. असदुद्दीन ओवेसींयांचे वडील सुल्तान सलाउद्दीन ओवेसींयांनी १९८४ मध्ये पहिल्यांदा या जागेवरून निवडणूक लढवली होती. तेव्हापासून हा मतदारसंघ ओवेसींकुटुंबाकडे आहे. २००४ मध्ये या जागेवरून असदुद्दीन ओवेसींयांनी लढण्यास सुरुवात केली. तेव्हापासून ते खासदार आहेत.
या बहुचर्चित मतदारसंघातून भाजपने प्रथमच एखाद्या महिलेला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने उमेदवारी दिलेल्या डॉ. माधवी लता कोम्पेला या शहरातील हयातनां सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्या विरुंजी हॉस्पिटलच्या अध्यक्षा आहेत. त्या सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्या भाष्य करत असतात. माधवी या भरतनाट्यम डान्सर देखील आहेत.
हैद्राबादमध्ये त्यांचा सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असतो. त्या आरोग्य, शिक्षण या क्षेत्राबरोबरच उपेक्षित समाजघटकांच्या आर्थिक विकासासाठी त्या विशेष प्रयत्न करत असतात. लोपामुद्दा चॅरिट्रेबल ट्रस्ट आणि लतामा फाऊंडेशनच्या माध्यमातून शहरातील मागासवर्गीयांच्या विकासासाठी त्या कार्यरत आहेत. त्यांनी कोटा महिला कॉलेजमधून राज्यशास्त्रात एमए केले आहे. ओवैसींना टक्कर देण्यासाठी भाजपने पहिल्यांदा महिला उमेदवाराला संधी दिली आहे. माधवी या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आग्रही असतात.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. भगवंत राव यांना उमेदवारी दिली होती. ओवेसी यांनी त्याचा २८ लाख मतांनी पराभव केला होता. ओवेसी यांना त्या निवडणुकीत ५८.९५ टक्के मतदान झाले होते, तर राव यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळून २६ टक्के मतदानावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे आता महिला उमेदवार उभे करून भाजपने नवा डाव खेळला आहे. असे असले तरी ओवेसींयांना हरवणे सोपे नाही. हैद्राबादमध्ये ओवैसींचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे निवडणुकीत भाजपची रणनीती यशस्वी होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यावर पत्रकारांशी बोलताना डॉ. माधवी म्हणाल्या की, या मतदारसंघातील मुस्लीम समुदायातही शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आहे. सार्वजनिक आरोग्य, आर्थिक सक्षमता नाही. त्यामुळे धर्मांध नेते त्यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत आहेत. त्यांच्या कल्याणासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे माधवी यांनी नमूद केले आहे.
हैद्राबाद शहराशिवाय भाजपने तेलंगणातील ८ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. राज्य भाजपचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी हे सिकंदराबादमधून निवडणूक लढवणार आहेत. करीमनगरमधून भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष बंडी संजय कुमार निझामाबादमधून डी. अरविंद, मलकजगिरीतून ई. राजेंद्र, छेवेला मतदारसंघात कोंडा विश्वेश्वर रेड्डी, नगरकर्नुल मतदारसंघातून पी. भारत, भोंगीरमध्ये बी. नरसिंह गौड आणि जाहिराबादमध्ये बी. बी. पाटील यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.