सीबीआय, ईडीविरुद्ध कोर्टात जाणार
#नवी दिल्ली
खोटी माहिती, पुरावे सादर केले जात असल्याबद्दल आपण केंद्रीय गुप्तचर खाते (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या तपास यंत्रणांविरुद्ध खटला दाखल करणार असल्याची घोषणा आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. केजरीवाल म्हणाले की, समजा मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमक्या अमक्या दिवशी १००० कोटी दिले असे विधान कोणत्याही पुराव्याशिवाय केले तर तुम्ही मला अटक करणार का ? ते ज्याला भ्रष्टाचार म्हणतात तेच धोरण आम्ही पंजाबमध्ये राबवले आणि महसुलामध्ये ५० टक्के वाढ झाली. त्याने अर्थकारणाची दिशा बदलली आणि हे धोरण पारदर्शक होते. तपास यंत्रणेच्या सूचनेनुसार आपण रविवारी हजर राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, मद्य धोरण प्रकरणी सीबीआयने समन्स बजावल्यामुळे केजरीवाल यांनी सोमवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे.
गेल्या वर्षी दिल्ली सरकारने जाहीर केलेल्या मद्य धोरणाची सीबीआय चौकशी करत आहे. या धोरणामुळे राजधानीतील मद्य विक्रीवरील सरकारचे नियंत्रण गेले आणि त्याचा खासगी मद्य विक्रेत्यांना मोठा फायदा झाला असा आक्षेप घेतला जात आहे. या धोरणासाठी कोट्यवधींची लाच दिली गेली आणि हाच लाचेचा पैसा गोव्यातील निवडणुकीसाठी वापरला गेल्याचा सीबीआयचा दावा आहे.
केजरीवाल म्हणाले की, १४ फोन नष्ट केल्याचा खोटा दावा सीबीआय करत असून त्यांनी कोर्टात खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. खोटी साक्ष देण्यासाठी सीबीआय साक्षीदारांचा कमालीचा छळ करत असून उद्या तुमची मुलगी कॉलेजला कशी जाते ते पाहतो अशा धमक्या दिल्या जात आहेत. कथित मद्य धोरणामुळे कोट्यवधीची माया जमवल्याचा सीबीआयचा दावा आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक महिने चौकशी केली, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांसह अनेकांना अटक केली तरी त्यांना लाचेचा एक पैसाही सापडलेला नाही. त्यांना जेव्हा एकही पैसा सापडला नाही तेव्हा त्यांनी गोवा निवडणूक प्रचारासाठी वापरल्याचा दावा केला. मात्र, त्याचा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नाही. आमचे सर्व व्यवहार चेकने होतात. त्यामुळे त्यांच्या दाव्यानुसार १०० कोटीतील एका रुपयांची लाच तरी आम्हाला दाखवा?
दरम्यान, मद्य धोरण प्रकरणी सीबीआयने समन्स बजावल्याने केजरीवाल यांनी विधानसभेचे सोमवारी विशेष अधिवेशन बोलावले आहे. मद्य धोरणातील कथित भ्रष्टाचारप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आता तुरुंगात आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी केंद्रीय गुप्तचर खाते (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या तपास यंत्रणांचा शस्त्रासारखा केंद्र सरकार वापर करत असल्याचा आरोप आप आणि अन्य विरोधी पक्षनेते करत आहेत.
केजरीवाल यांच्यावर खटला दाखल करण्याच्या घोषणेबद्दल केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजेजू प्रतिक्रिया देताना ट्विटमध्ये म्हणतात की, कोर्टाने दोषी ठरवले तर त्यांच्याविरुद्धही खटला दाखल करणार असल्याचा उल्लेख करण्यास केजरीवाल विसरलेले दिसतात. कायद्याला त्यांच्या नियमानुसार काम करू द्या. आपण कायद्याच्या राजवटीवर विश्वास ठेवावयास हवा.
वृत्तसंस्था