अमृतपालसिंग शरण येणार?
#चंडीगढ
गेल्या दहा दिवसांहून अधिक काळ पोलीस अटक टाळण्यात यशस्वी झालेला खलिस्तानी समर्थक आणि विघटनवादी पंजाब दे वारिस या संघटनेचा म्होरक्या अमृतपालसिंग हा पंजाबमध्ये आला असून तो शरणागती पत्करणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
अमृतपालसिंग होशियारपूरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तो तेथून अमृतसरच्या दिशेने गेल्याचे सांगण्यात येते.अनेक गुन्ह्यात हवा असलेल्या अमृतपालसिंगच्या अटकेसाठी होशियारपूर आणि आसपासच्या खेड्यात पोलिसांनी मंगळवारी रात्री घरोघरी शोधमोहीम राबवली होती. मारियान खेड्यातील गुरुद्वारातून एका इनोव्हाची मदत घेऊन त्याने पुन्हा पलायन केल्याचे दिसते. ही इनोव्हा सोडून एका शेतातून त्याने पळ काढल्याचे दिसते. त्याच्या अटकेसाठी जागोजाग बॅरिकेड लावल्या असून जोरदार शोध मोहीम हाती घेतली आहे. शरण येण्यापूर्वी एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला मुलाखत देण्याची त्याची योजना होती. मात्र, पोलीस मागावर असल्याचे लक्षात आल्यावर त्याने मुलाखतीचा नाद सोडून पळ काढला. भिंद्रनवाले आणि त्यानंतर राज्यातील जनतेला सोसाव्या लागणाऱ्या कालखंडाच्या पार्श्वभूमीवर अमृतपालच्या अटकेसाठी पंजाब पोलिसांवर मोठा दबाव आहे. शिखांसाठी स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीला पाठिंबा देणाऱ्या अमृतपालच्या समर्थकांनी गेल्या महिन्यात पोलीस ठाण्यावर सशस्र हल्ला केला होता.
दरम्यान, मंगळवारी अमृतपालसिंग हा दिल्लीच्या रस्त्यावरून फिरत असल्याचा दावा काही सीसीटीव्ही फूटेजवरून केला जात होता. दिल्ली पोलिसांनी तसा संशय व्यक्त केला होता. या सीसीटीव्हीमध्ये जी व्यक्ती दिसते ती पारंपरिक शीख पोशाखात दिसत नाही. अमृतपालने आतापर्यंत वेगवेगळे अवतार धारण करत पोलिसांना चकवा दिलेला आहे. दिल्लीतील रस्त्यावरून तो फिरत असल्याचे सीसीटीव्ही फूटेज हे २१ मार्चचे आहे. अमृतपालविरुद्ध पंजाब पोलिसांनी मोहीम सुरू केल्यानंतर तीन दिवसांनी तो दिल्लीत होता असे दिसते. अमृतपालसिंग अद्याप फरार असून विविध राज्यांना दक्ष राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच भारत सरकारने नेपाळला विशेष सूचना दिली आहे. १८ मार्च रोजी पंजाब पोलिसांनी अमृतपालच्या अटकेसाठी कारवाई सुरू केली. त्यानंतर तो हरयाणा आणि दिल्लीमार्गे नेपाळकडे गेल्याचे सांगितले जाते. पोलिसांना झुकांडी दिल्यापासून अमृतपालचे सीसीटीव्हीवर अनेकदा दर्शन झालेले आहे. दरम्यानच्या काळात त्याचे अनेक सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल केलेले आहेत. अमृतपालसिंग आणि त्याचा सहकारी पालप्रितसिंग अनेक वेळा सोशल मीडियावर दिसले असून असे फोटो पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी व्हायरल केले जात असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पालप्रितनेच घेतलेला आणि शेअर केलेला एक फोटो व्हायरल झालेला असून त्यात अमृतपाल शीतपेय घेत असताना दिसत आहे.
वृत्तसंस्था