गोळ्या घालायच्या असतील तर न्यायालये कशासाठी आहेत?
#निझामाबाद
उत्तर प्रदेशातील उमेश पाल हत्याकांड प्रकरणातील फरार आरोपी गँगस्टर अतिकचा मुलगा असद आणि शूटर गुलाम मोहम्मद हे दोघेही उत्तर प्रदेश पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारले गेले आहेत. यावरून देशपातळीवर उत्तर प्रदेश पोलिसांचे कौतुक केले जात असताना एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी या प्रकरणी योगी सरकावर टीकास्त्र सोडले आहे. धर्माच्या नावाखाली उत्तर प्रदेशातील पोलीस एन्काऊंटर करतात, असा आरोप त्यांनी केला आहे. पोलीसच दंड देणार असतील तर न्यायालये कशासाठी आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
कुप्रसिद्ध गँगस्टर अतिकचा मुलगा असद आणि शूटर गुलाम मोहम्मद चकमकीत मारल्या गेल्याचे वृत्त समोर येताच अनेक प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी या चमकीबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. गुरुवारी ओवेसी तेलंगणाच्या निझामाबाद येथे बोलत होते. जुनैद आणि नसिरला ज्यांनी मारले त्यांनाही भाजप सरकार चकमकीतच मारणार आहे का, असा सवाल उपस्थित करत ओवेसी म्हणाले, कारण तुम्ही धर्माच्या नावाखाली खोट्या चकमकी घडवून आणता. जुनैद आणि नसीर यांच्या हत्येतील एकच आरोपी पकडला गेला, इतर नऊ आरोपी अद्यापही गायब आहेत.
त्यांचे एन्काऊंटर कधी करणार? उत्तर प्रदेशात कायदा पायदळी तुडवला जातो आहे. तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्था कमजोर करायची आहे. मग न्यायालये कशासाठी आहेत? न्यायाधीश कशासाठी आहेत? गोळ्या घालूनच न्याय द्यायचे ठरवले असेल तर न्यायालये बंद करा. न्यायाधीश काय काम करणार. हे काम न्यायपालिकेचे आहे. तुमचे नाही. तुम्ही आरोपींना पकडा. कोणी हत्या करत असेल तर शिक्षा द्या त्यांना. बारा, चौदा वर्षे शिक्षा द्या, असे म्हणत ओवेसी यांनी योगी सरकारवर आगपाखड केली.
वृत्तसंस्था