संग्रहित छायाचित्र
#नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक निकालांचा कल पाहता इंडिया आघाडीने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. अनेक राज्यात इंडिया आघाडीने भाजपला टक्कर दिली अन् विजय मिळवला आहे. सध्या आलेले कल आणि निकालानुसार सत्ताधारी एनडीएला ३०० च्या आत जागा मिळाल्या असून भाजपला स्वबळावर सत्ता मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. इंडिया आघाडीला जवळपास २२८ जागांवर आघाडी मिळत असल्याचे चित्र आहे. अशातच आता राहुल गांधी यांचं सध्या कौतुक होताना दिसत आहे.
आता निवडणूक निकालानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, आम्ही फक्त भाजपविरुद्ध लढलो नाही तर स्वतंत्र संस्थांविरोधी देखील लढलो, आम्ही संविधान वाचवण्यासाठी लढलो. संविधान वाचवण्यासाठी संपूर्ण जनता एकत्र आली. भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण केले पण आम्ही एकत्र लढलो. मोदी आणि शहा यांनी यंत्रणांचा गैरवापर केला पण इंडिया आघाडीने देशाला नवा दृष्टिकोन दिला आहे. मोदींचा पराभव म्हणजे अदानींचा पराभव. लोकशाही वाचवण्याचे काम देशातील सर्वात गरीब लोकांनी केले आहे. लोकांनी या निकालामधून मोदी आणि शहा यांना संदेश दिला आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
सरकार स्थापन करणार का, असा सवाल जेव्हा राहुल गांधी यांना विचारला गेला तेव्हा आम्ही मित्रपक्षांशी चर्चा करून घेऊ. उद्या इंडिया आघाडीची बैठक आहे. त्यात जो निर्णय होईल, तसा निर्णय आम्ही घेऊ, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. दरम्यान, अदानींचे शेअर तुम्ही पाहिले? जनता मोदींचा थेट संबंध अदानींशी समजत आहे. जनतेनेच मोदींना नाकारले आहे. आम्ही ते ज्या पद्धतीने देश चालवत आहेत त्याचे समर्थन करत नाही हेच जनतेने पंतप्रधानांना दाखवून दिले आहे आणि मला या जनतेचा प्रचंड अभिमान वाटतो, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यावेळी राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या जनतेचे आणि प्रियांका गांधी यांचे कौतुक केले आहे.