व्यापम घोटाळ्यातील दोषींना अखेर शिक्षा
#नवी दिल्ली
मध्य प्रदेशातील बहुचर्चित व्यापम घोटाळ्याचा निकाल आला आहे. या प्रकरणात दोषी ठरलेल्या ७ जणांना प्रत्येकी ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, १२ आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
२०१३ मध्ये भरती परीक्षेतील घोटाळा उघडकीस आला होता. या प्रकरणात एकूण २१ जणांना आरोपी करण्यात आले होते, त्यापैकी २ आरोपींचा मृत्यू झाला. तब्बल १० वर्षांनंतर या खटल्याचा निकाल आला आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने मंगळवारी पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा घोटाळ्याची सुनावणी केली आणि दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर ७ आरोपींना दोषी ठरवून त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
गेल्या १० वर्षांत या प्रकरणाच्या तपासादरम्यान ४१ आरोपींचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाचा तपास मध्य प्रदेशचे तत्कालीन राज्यपाल राम नरेश यादव यांचा मुलगा शैलेश यादव यांच्यापर्यंत पोहोचला होता, मात्र २५ मार्च २०१५ रोजी शैलेशचा आकस्मिक मृत्यू झाल्याने प्रकरणाला कलाटणी मिळाली होती. शैलेश घरात संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळून आला होता.
या प्रकरणात राम नरेशही आरोपी होता. मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापम) मध्य प्रदेशमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा, भरती परीक्षा आयोजित करण्यासाठी जबाबदार आहे.
परीक्षेशी संबंधित सर्व प्रक्रिया व्यापमद्वारेच केली जाते, पण सरकारी नोकऱ्या पैसे घेऊन देण्यात आल्या, असा आरोप व्यापमवर होऊ लागला. त्यासाठी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रवेशांमध्ये फसवणूक केली जाते.
एक हजार बनावट भरतीची अफवा सुरू असताना ही बाब उघडकीस आली होती. वैद्यकीय महाविद्यालयातही खोटी नोकरभरती झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
घोटाळा कसा उघडकीस आला?
२०१३ मध्ये एमबीबीएस भरती परीक्षेदरम्यान पोलिसांनी बनावट उमेदवार पकडले होते. तपासात बनावट भरती करणारी टोळीचा पर्दाफाश झाला होता. चौकशीदरम्यान डॉ. जगदीश सागर यांचे नाव पुढे आले, त्यांनी चौकशीदरम्यान तत्कालीन शिक्षणमंत्री लक्ष्मीकांत शर्मा यांच्याबाबत खुलासा केला होता. १६ जून २०१४ रोजी त्यावेळचे व्यापमचे अध्यक्ष लक्ष्मीकांत शर्मा यांना अटक करण्यात आली. यानंतर अरबिंदो मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष डॉ. विनोद भंडारी आणि व्यापमचे परीक्षा नियंत्रक डॉ. पंकज त्रिवेदी यांना अटक करण्यात आली. माजी मंत्री ओ पी शुक्ला यांना नोकरीच्या बदल्यात पैसे घेताना रंगेहात पकडण्यात आले होते.
हे आहेत चौकशीत झालेले खुलासे
वैद्यकीय-अभियांत्रिकी महाविद्यालयात पैसे घेऊन प्रवेश देण्यात आला.
मंत्री, अधिकारी, महाविद्यालयांचे प्राचार्यही या रॅकेटशी जोडले गेले होते. दलाल सौदे करायचे.
व्यापमचे कार्यालय हे प्रवेश आणि नोकऱ्यांमध्ये फसवणुकीचे अड्डा होते.
लक्ष्मीकांत शर्मा हे परीक्षा नियंत्रक डॉ. पंकज त्रिवेदी यांना अर्जदारांची यादी आणि रोल नंबर देत असत.
परीक्षा आणि भरतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक झाली.
कॉपी करण्यासाठी परीक्षार्थीला बनावट परीक्षार्थीजवळ बसवण्यात आले.
मूळ उमेदवाराच्या जागी बनावट उमेदवाराने परीक्षा दिली.
परीक्षार्थी उत्तरपत्रिका काहीच लिहायचे नाहीत, जी नंतर लिहिली जायची.
भरतीचे निकाल जाहीर करताना गुण वाढवण्यात आले.