वरुणने केले बीसीसीआयला क्लीन बोल्ड!

१५ दिवस जखमी असताना अनेक महिन्यांपासून जखमी असल्याचे दाखवत टी-२० विश्वचषकानंतर सातत्याने संघाबाहेर ठेवल्याचा वरुण चक्रवर्तीचा दावा

VarunbowledBCCIcleanly!

वरुणने केले बीसीसीआयला क्लीन बोल्ड!

#नवी दिल्ली

आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना आपल्या फिरकी गोलंदाजीचा ठसा उमटवताणाऱ्या आयपीएलमध्ये वरुण चक्रवर्तीने आपल्या दुखापतीबाबत अफवा पसरवण्यात आल्याचे थेट वक्तव्य करीत बीसीसीआयच्या निवड धोरणातील पक्षपात उघडा पाडला आहे.

२०२०च्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला क्लीन बोल्ड केल्यापासून ‘मिस्ट्री स्पिनर’ म्हणून चर्चेत आलेला वरुण २०२१ मध्ये टी-२० विश्वचषक खेळला होता. यानंतर दुखापत झाल्यानंतर तो टीम इंडियात पुनरागमन करू शकला नाही. वरुण म्हणाला, ‘‘माझ्या दुखापतीबाबत अफवा पसरवण्यात आल्या होत्या. मी दीर्घकाळ जखमी नव्हतोच. टी-२० विश्वचषकानंतर मला संघात समाविष्ट करण्याबाबतही विचारले गेले नाही. त्या स्पर्धेनंतर मी दोन आठवडे दुखापतग्रस्त होतो, परंतु जेव्हा जेव्हा मी निवडीबद्दल विचारले, तेव्हा मला अनेक महिने दुखापत झाल्याचे भासवण्यात आले.’’

तामिळनाडूकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा वरुण चक्रवर्ती आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो. २०२०च्या आयपीएलमधील चमकदार कामगिरीनंतर २०२१ मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध भारताकडून टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २०२१ मध्ये तो टी-२० विश्वचषकही खेळला होता, पण या स्पर्धेनंतर तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकला नाही. तो सध्या आयपीएलची तयारी करत आहे.

एका मुलाखतीत वरुणने बीसीसीआयच्या संघनिवडीतील नि:पक्षपातीपणाचा बुरखा टराटरा फाडला. ‘‘विश्वचषकानंतर पुनरागमन करणे माझ्यासाठी खूप कठीण होते. माझी दुखापत फारशी गंभीर नव्हती, मी २-३ आठवड्यांनी बरा झालो. मात्र रिकव्हरीनंतर व्यवस्थापनाने मला विचारणेच बंद केले. संघनिवडीबाबत मी अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांना मी दुखापतग्रस्त झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, मी तर मी पूर्णपणे तंदुरुस्त होतो आणि देशांतर्गत क्रिकेट खेळत होतो. मला दुखापत झाल्याची अफवा पसरवण्यात आली होती, त्यामुळे मला राष्ट्रीय संघातून बाजूला केले जाऊ शकते, पण आयुष्य असे आहे, हे माझ्यासाठी खूप कठीण आहे,’’ असे स्पष्टपणे सांगत त्याने बीसीसीआयला उघडे पाडले.

मी सत्य स्वीकारले हेच उत्तम. यावेळी मला कोणीही मदत करू शकत नाही. प्रत्येकाचा स्वतःचा संघर्ष असतो. मी कोणाच्या मागे धावू शकत नाही आणि रडू शकत नाही की, तुम्ही मला का निवडत नाही? मला वाईट वाटते, मी डिप्रेशनमध्ये जात आहे. हे सर्व करणे म्हणजे व्यावसायिकता नाही. सध्या, माझ्यासाठी सर्वोत्तम गोष्ट म्हणजे माझ्या देशांतर्गत सामन्यांवर लक्ष केंद्रित करणे, माझे सर्वोत्तम प्रयत्न करणे आणि बाकीचे देवाच्या हातात सोडणे. जे होईल ते बघितले जाईल. अफवांमुळे माझे करिअर थांबले, पण मी आता ते स्वीकारले आहे, असे सांगत वरुणने आव्हानांना सामोरे जाण्याची जिद्द बोलून दाखवली.वृत्तसंंस्था

आता कोणाकडून कोणतीही अपेक्षा नाही...

वरुण म्हणाला, ‘‘आयपीएल २०२२ माझ्यासाठी चांगले नव्हते कारण २०२१ च्या विश्वचषकानंतर जे घडले त्यातून मी सावरू शकलो नाही. मी उद्ध्वस्त झालो होतो. मला कसे तरी टीम इंडियात पुनरागमन करायचे होते. मला स्वत:ला सर्वांसमोर सिद्ध करायचे होते, म्हणून मी माझ्या गोलंदाजीत बरेच बदल केले. मात्र, माझी मानसिक शांतता हिरावून घेतली गेली. मला आतून अशक्तपणा जाणवू लागला, मी सामान्यपणे गोलंदाजी करू शकलो नाही. त्यामुळे माझी आयपीएलमधील कामगिरीही खालावली. मी पुन्हा क्रिकेटमधून ब्रेक घेतला, माझ्यासोबत काय होत आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मी आता शांत आहे, मला समजते की गोष्टी कशा चालतात. सर्वोत्तम खेळाडूंनाही आता बाजूला केले जात आहे, मग मी मोठा खेळाडू आहे का? आता मला कोणाकडून कोणतीही अपेक्षा नाही, माझ्या मार्गावर काहीही आले तरी मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करेन.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest