संयुक्त राष्ट्रसंघाच्या राजदूतांना चावले झुरळ
#नवी दिल्ली
गेल्या काही महिन्यांपासून भारतीय विमानातील सुविधांबाबत अनेक तक्रारी येत आहेत. अनेकदा प्रवाशांशी गैरवर्तन करण्याच्या घटनाही घडल्या आहेत. आता अशीच तक्रार संयुक्त राष्ट्राच्या राजदूतांनी केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे राजदूत गुरप्रीत एअर इंडियाच्या विमानाने अमेरिकेहून नवी दिल्लीला येत होते, पण या उड्डाणादरम्यान त्यांना खूप त्रास झाला. विमानाची सीटही तुटली होती. शिवाय त्यांना झुरळाने चावा घेतल्याचे त्यांनी ट्विट केले आहे.
गुरप्रीत यांनी १२ मार्च रोजी आपल्या ट्विटर हँडलवर काही फोटो शेअर केले होते आणि त्यांना काय प्रकारचा त्रास होता हे सांगितले होते. गुरप्रीत यांनी ट्विट केले होते की, संयुक्त राष्ट्रसंघाचा राजदूत म्हणून मी जगभर फिरलो आहे, पण एअर इंडिया १०२ जेएफके (जॉन एफ केनेडी विमानतळ, न्यूयॉर्क) ते दिल्ली हा प्रवास माझा सर्वात वाईट विमानप्रवास ठरला आहे. एअर इंडियाच्या विमानात तुटलेली खुर्ची होती. कॉल बटण उपलब्ध नव्हते. मनोरंजनासाठी आणि वाचनासाठीचे दिवे नाहीत, पण भरपूर झुरळे आणि विषारी फवारणी होती. ग्राहक सेवेकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. २० मार्च रोजी गुरप्रीत यांनी पुन्हा एकदा आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट केले आणि रतन टाटा यांनाही टॅग केले. न्यूयॉर्कहून येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झुरळे कशी होती, सुरक्षा उपकरणांशिवाय नॉन-ऑपरेशनल स्टँडर्डमध्ये बोर्डिंग कसे चालते याबद्दल काही स्पष्टीकरण आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. वृत्तसंस्था