...त्या जाहिराती आजच्या आज बंद करा
#नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीला दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीवरून चांगलेच फटकारले आहे. तसेच या कंपनीविरोधात कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्नदेखील विचारला. न्यायालयाने पतंजली आयुर्वेदच्या आरोग्य संबंधित सर्व जाहिरातींवर बंदी घातली आहे. कंपनी यापुढे अशा जाहिराती करू शकणार नाही.
कंपनीच्या जाहिरातींविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद आणि आचार्य बालाकृष्णन यांना दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्याप्रकरणी न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल नोटीस पाठवण्यात आली आहे. या कंपनीच्या जाहिराती अनेक मीडिया प्लॅटफॉर्म्सवर दाखवल्या जातात, ज्यामध्ये अनेक चुकीचे दावे केले जातात, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे म्हणणे आहे. अवमान याचिकेवर उत्तर देण्यासाठी कंपनी आणि मालक बालाकृष्णन यांना न्यायालयाने तीन आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश हिमा कोहली आणि जस्टिस ए. अमानु्ल्लाह यांच्या खंडपीठाने यापूर्वी दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याबद्दलदेखील टीका केली आहे. गेल्या वर्षी न्यायालयाने कंपनीला जाहिरातींवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. नोव्हेंबर महिन्यात न्यायालयाने पतंजलीला सांगितले होते की, आदेशाचे पालन केले गेले नाही तर चौकशीनंतर कंपनीच्या सर्व प्रॉडक्ट्सवर एक-एक कोटींचा दंड लावण्यात येईल. पहिल्या आदेशाचा हवाला देत न्यायालयाने म्हटले की, सर्व इशारे देऊनही तुम्ही तुमची औषधे केमिकलयुक्त औषधांपेक्षा चांगली आहेत, असा दावा करत आहात. अखेर कंपनीच्या जाहिरातींविरोधात काय कारवाई केली गेली, असा सवालही न्यायालयाने आयुष मंत्रालयाला विचारला. सरकारच्या वतीने सांगण्यात आले की, याबद्दल डेटा गोळा केला जात आहे. न्यायालयाने केंद्र सरकारच्या या उत्तरावर नाराजी व्यक्त केली आणि कंपनीच्या जाहिरातींचे मॉनिटरिंग करण्याचे आदेश दिले आहेत.