दूधसागर धबधब्यावर पर्यटकांचा 'ट्रॅफिक जाम'
# बंगळुरू
पावसाळ्यात गोव्यातील दूधसागर धबधब्याला भेट देणे हा दक्षिणेतील अनेक वर्षा पर्यटकांचा अलिखित नियम आहे. यावर्षीही हेच चित्र दिसले असून रविवारी शेकडो पर्यटकांनी प्रचंड गर्दी केल्याने तेथे ट्रॅफिक जाम झाले होते. पर्यटक रेल्वे रुळावरून चालत जात असल्याने त्यांना पोलिसांनी अडवून उठाबशा काढण्याची शिक्षा दिली.
दूधसागर हे पावसाळ्यातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. मात्र, ऐन पावसाळ्यात प्रचंड गर्दी झाल्याने ट्रेकिंगवेळी अपघाताची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर गोवा रेल्वे पोलीस आणि वन विभागाने काही दिवसांपूर्वी धबधब्यावर जाण्यास बंदी घातली होती. बंदी असतानाही रविवारी शेकडो पर्यटक धबधबा पाहण्यासाठी आले होते. हे पर्यटक दूधसागर रेल्वे स्थानकावर उतरून रेल्वे रुळावरून चालत पुढे धबधब्यापर्यंत जात होते. पोलिसांनी या पर्यटकांना वाटेतच थांबवले आणि पुढे जाण्यास परवानगी नाकारली. यानंतर पर्यटकांनी रुळावरून हटण्यास नकार दिला. याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
याशिवाय आणखी एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडीओत रेल्वे पोलीस दूधसागर रेल्वे रुळाजवळ ट्रेकर्सना उठाबशा काढायला लावत आहेत. दूधसागर स्टेशनच्या आधी हे लोक रेल्वेमधून उतरले होते आणि रुळाच्या बाजूने चालत होते. रेल्वेचे नियम मोडल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर ही कारवाई केली.
या घटनेनंतर रेल्वेने लोकांना रेल्वे रुळाच्या बाजूने चालत जाऊ नये असे आवाहन केले आहे. रेल्वेने ट्विटरवर म्हटले आहे की, आम्ही तुम्हाला रेल्वे डब्यातून दूधसागर धबधब्याच्या सौंदर्याचा आनंद घेण्याचे आवाहन करतो. रुळाच्या बाजूने चालत जाणे तुमच्या सुरक्षेलाच धोका निर्माण करत नाही, तर तो रेल्वे कायद्याच्या कलमानुसार गुन्हा आहे. त्यामुळे गाड्यांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो. दुधसागर किंवा ब्रागांझा घाटासह इतर कोणत्याही स्थानकावर उतरण्यास बंदी घालण्यात आली आहे. सर्व प्रवाशांना विनंती आहे की, तुमच्या सुरक्षिततेसाठी बनवलेले नियम पाळावेत.