प्रातिनिधिक छायाचित्र....
Delhi Assembly Election 2025 Schedule : दिल्लीतील 70 विधानसभा जागांसाठी निवडणूक आयोगाने मंगळवारी तारखा जाहीर केल्या. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि मतमोजणी 8 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, निवडणुकीची अधिसूचना 10 जानेवारी आहे, नामांकनाची अंतिम तारीख 17 जानेवारी आहे. 18 जानेवारी रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस 20 जानेवारी असेल. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 23 फेब्रुवारीला संपत आहे. म्हणजे या आधी सरकार स्थापन होणे गरजेचे आहे.
#DelhiDecides
— Election Commission of India (@ECISVEEP) January 7, 2025
Schedule for Single Phase #DelhiElections2025 & Bye-Elections.
🗓️Date of Poll : 05-02-2025
🗓️Date of Counting : 08-02-2025#ECI
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम :
निवडणुकीची अधिसूचना - 10 जानेवारी
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख- 17 जानेवारी
उमेदवारी अर्ज छाननी करण्याची तारीख- 18 जानेवारी
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख- 20 जानेवारी
मतदानाची तारीख- 5 फेब्रुवारी
निकालाची तारीख- 8 फेब्रुवारी
उमेदवारांची घोषणा करण्यात आप आघाडीवर...
आप, काँग्रेस आणि भाजप यांच्यात दिल्ली काबीज करण्यासाठी प्रमुख लढत होणार आहे. दिल्लीतील निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांची यादी आली आहे. आम आदमी पार्टीने सर्व जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यानंतर काँग्रेसनेही आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. उमेदवार जाहीर करण्यात भाजप तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी पहिल्या यादीत 29 उमेदवारांची नावे दिली असून पक्षाची दुसरी यादीही लवकरच येण्याची शक्यता आहे.
मुख्य निवडणूक आयुक्तांची शेवटची पत्रकार परिषद
लोकसभा निवडणुकीत नवा विक्रम झाल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्ली निवडणुकीबाबत पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी लोकशाहीत तरुणांचा सहभाग वाढवण्याचे तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करण्याचे आवाहन केले आहे. राजीव कुमार पुढे म्हणाले की, मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ही माझी शेवटची पत्रकार परिषद आहे.
अंतिम मतदार यादी जाहीर...
यापूर्वी सोमवारी (6 जानेवारी) भारताच्या निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आणि एकूण 1 कोटी 55 लाख 24 हजार 858 मतदार नोंदणीकृत असल्याचे सांगितले. त्यापैकी 84 लाख 49 हजार 645 पुरुष मतदार आहेत, तर 71 लाख 73 हजार 952 महिला मतदार आहेत.
Delhi Election 2025 : गेल्या निवडणुकांचे असे होते निकाल...
जर आपण मागील विधानसभा निवडणुकीच्या निकालांबद्दल बोललो, तर आम आदमी पक्षाने 2020 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत बंपर विजय मिळवला होता. येथे 70 पैकी 62 जागा 'आप'ने जिंकल्या होत्या, तर भाजपला केवळ आठ जागा मिळाल्या होत्या. तर मागील निवडणुकीत काँग्रेसचा पूर्ण सफाया झाला होता. काँग्रेसच्या एकाही उमेदवाराला विजयाची नोंद करता आली नव्हती. दरम्यान, 2020 च्या विधानसभा निवडणुकीची घोषणा 6 जानेवारी रोजी झाली होती. 8 फेब्रुवारी 2020 रोजी सर्व 70 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले होते आणि 11 फेब्रुवारी रोजी निकाल घोषित करण्यात आला होता.
2013 मध्ये 'आप'ने काँग्रेससोबत आघाडी करून सरकार स्थापन केले होते, परंतु हे सरकार फार काळ टिकू शकले नाही. यापूर्वी 15 वर्षे दिल्लीत काँग्रेसची सत्ता होती तर 25 वर्षांहून अधिक काळ भाजप दिल्लीतील सत्तेपासून दूर आहे.