टीएमसी म्हणजे 'तू, मी आणि करप्शन'
#कोलकाता++
पश्चिम बंगालमध्ये सध्या राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून संदेशखालीमधील शाहजहान शेख यांच्या अटकेच्या मागणीसाठी भाजपाने जोरदार निदर्शने केली. तर इंडिया आघाडीला डावलून ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यामुळे काँग्रेसही ममता बॅनर्जी यांच्याविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते. भाजपासाठी पश्चिम बंगालमध्ये अधिकाधिक जागा निवडणून आणण्याचे आव्हान आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या कृष्णा नगर येथे एक जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीकास्र सोडले. तृणमूल काँग्रेस पक्षाचे इंग्रजीतील छोटे स्वरुप टीएमसी असे आहे. या नावाचा अर्थ सांगताना पंतप्रधान मोदी म्हणाले, तू, मी आणि करप्शन असा आहे.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “ममता बॅनर्जी यांच्या काळात पश्चिम बंगालची अधोगती झाली. प्रत्येक योजनेत याठिकाणी भ्रष्टाचार दिसतो. केंद्राच्या योजनांनाही टीएमसी सरकार स्वतःचे स्टिकर लावून खपवते. गरीबांचा अधिकार हिरावून घेण्यात या सरकारला काहीच कमीपणा वाटत नाही. अत्याचार आणि छळाचे दुसरे नावच आता टीएमसी असे घेतले जाते. टीएमसीसाठी बंगालचा विकास ही प्राथमिकता नसून भ्रष्टाचार, घराणेशाही आणि छळवाद हेच त्यांचे महत्त्वाचे काम राहिले आहे. बंगालच्या जनतेने गरीब राहावे, असा टीएमसीचा प्रयत्न आहे. जेणेकरून त्यांचा राजकारणाचा खेळ असाच सुरू राहिल. कधीकाळी 'माँ, माटी मानुष' घोषणा देत सत्तेवर आलेल्या दीदींनी राज्यातील जनतेची पिळवणूक केली आहे.
ममता बॅनर्जी सरकारच्या अडचणीत वाढ
एकीकडे पंतप्रधान मोदी ममता बॅनर्जी यांच्या सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात आवाज उठवत आहेत. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांतही पक्षांतर्गत कारभाराच्या विरोधात नाराजीचे वातावरण आहे. पक्षातील अनेक नेत्यांनी पक्षाला अखेरचा रामराम म्हणण्याची तयारी सुरु केली आहे. कुणाल घोष यांनी नुकतेच तृणमूल काँग्रेस सोडला असून लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. संदेशाखाली प्रकरणावरून वातावरण तापले असताना घोष यांनी सुदीप बॅनर्जी यांच्या बँक खात्यांची ईडी आणि सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी करत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणेने यापूर्वीच या प्रकरणी शाहजहा शेखला अटक केलेली आहे.
वृत्तसंस्था