तीनशे शालेय विद्यार्थ्यांचे नायजेरियामध्ये अपहरण
#अबुजा
साधारण दहा वर्षांपूर्वी अपहरणांच्या घटनांमुळे नायजेरियाची जगभर चर्चा होत असायची. सध्याही नायजेरियामध्ये पुन्हा एकदा अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेक महिन्यांपासून अंतर्गत संघर्षाचा सामना करत असलेल्या नायजेरियाच्या वायव्य भागातील कुरिगा येथील शाळेतून एका सशस्त्र टोळीने शाळेतील जवळपास ३०० विद्यार्थ्यांचे अपहरण केले आहे. या घटनेला दोन दिवस उलटले असले तरी या विद्यार्थ्यांचा ठावठिकाणा समजलेला नाही.
नायजेरिया हा आफ्रिका खंडातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. या देशात गेल्या दहा दिवसांत अपहरणाच्या दोन घटना घडल्या आहेत. गेल्या आठवड्यात सोकोतो प्रांतातून बंदूकधाऱ्यांनी १५ विद्यार्थ्यांचे अपहरण केले असून त्यानंतर दोनच दिवसांत बोर्नो या प्रांतातून सुमारे ३०० जणांचे अपहरण केले आहे. याच बोर्नो प्रांतात २०१४ मध्ये इस्लामिक कट्टरवाद्यांनी दोनशेहून अधिक मुलींचे शाळेतून अपहरण केले होते. दोन दिवसांपूर्वी कुरिगा येथील शाळेमध्ये काही बंदूकधारी घुसले आणि त्यांनी सुमारे तीनशे विद्यार्थ्यांचे अपहरण केले. या अपहरणाची जबाबदारी कोणत्याही संघटनेने अद्याप स्वीकारलेली नाही. मात्र, वसाहतींच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या भटक्या टोळ्यांनीच हे अपहरण केल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.
ज्या शाळेतून अपहरण झाले, ती शाळा जंगलालगत आहे. हल्लेखोरांनी शाळेला वेढा घालत हवेत गोळीबार करत दहशत निर्माण केली आणि विद्यार्थ्यांना घेऊन ते जंगलात गेले. अपहरण झालेल्या तीनशे विद्यार्थ्यांपैकी किमान शंभर विद्यार्थी बारा वर्षांच्या आतील आहेत. पोलिसांनी जंगलामध्ये शोध घेण्यास सुरुवात केली असली तरी दोन दिवसांनंतरही मुलांचा पत्ता लागलेला नाही.
वृत्तसंस्था