हजारीबाग येथील ओएसिस शाळेतून जप्त करण्यात आलेले पेपर
पाटणा/रांची: नीट पेपर लीकप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी (दि. २८) झारखंडमधील हजारीबाग येथून तीन जणांना अटक केली. त्यात ओएसिस स्कूलचे प्राचार्य एहसान उल हक, उपप्राचार्य इम्तियाज आणि पत्रकार जमालुद्दीन यांचा समावेश आहे.
सीबीआयकडून या तिघांनाही झारखंडमधून बिहारमध्ये आणण्यात आले. या प्रकरणी २७ जून रोजी सीबीआयने बिहारच्या पाटणा येथून दोघांना अटक केली होती. सीबीआयने शुक्रवारी दिवसभर एहसान उल हकसह तिघांची चौकशी केली. आता पथक घटनास्थळी नेऊन पुरावे गोळा करणार आहेत. या प्रकरणात आतापर्यंत पाच राज्यांमध्ये पोलिसांनी २७ हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.
सीबीआय आणि पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मे रोजी नीट प्रश्नपत्रिका प्रथम कुरिअर एजन्सी ब्लू डार्टच्या हजारीबाग नूतन नगर केंद्रातून बँकेत नेण्याऐवजी ओएसिस शाळेत आणण्यात आली. यानंतर येथून बँकांना पाठवण्यात आले. शाळेतच प्रश्नपत्रिकेचे पाकीट उघडण्यात आल्याचा संशय आहे.
शुक्रवारीच सीबीआय आरोपी चिंटू आणि मुकेशसह पटना येथील त्यांचा मित्र रॉकीच्या घरी पोहोचली. पटनाच्या कंकरबाग येथील रॉकीच्या घरातून अनेक पुरावे सापडले आहेत. देवघरमध्ये चिंटूच्या अटकेनंतर रॉकी फरार झाला होता. सीबीआयने चिंटू, मुकेश, आशुतोष आणि मनीष कुमार यांच्या मोबाईलची तपासणी केली. हे सर्व आरोपी गेल्या 6 महिन्यांपासून एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्येक आरोपीला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या.
यापूर्वी, नीट पेपर लीक प्रकरणात सीबीआयने 2 आरोपी मनीष प्रकाश आणि आशुतोष यांना गुरुवारी पाटणा येथून अटक केली होती. या दोघांनी रात्रीसाठी पाटण्यात प्ले अँड लर्न स्कूल बुक केले होते.
या शाळेत २० ते २५उमेदवारांना एकत्र करून उत्तरांची घोकणपट्टी करून घेतली. येथेच जळालेल्या पुस्तिकेचे तुकडे सापडले. केंद्रीय तपास यंत्रणा गेल्या ३ दिवसांपासून ११ जणांची चौकशी करत आहे. सीबीआयने २६ जून रोजी बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे युनिटकडून हे प्रकरण ताब्यात घेतले.
यूजीसी नेटचा पेपरही ओएसिस स्कूलमधूनच फुटला?
हजारीबाग येथील ओएसिस शाळेच्या मुख्याध्यापकाची सीबीआय तीन दिवस चौकशी करत होती. शाळेत चौकशी सुरू असताना एफएसएल टीमलाही पाचारण करण्यात आले. पथकाने काही पुरावेही गोळा केले आहेत. दुसरी माहिती यूजीसी नेटशी संबंधित आहे, जी या शाळेची आहे. या केंद्रावर यूजीसी नेट परीक्षाही घेण्यात आली होती. या शाळेतून नेटच्या प्रश्नपत्रिकाही फुटल्याचा संशय आहे. पथकाने शाळेचे उपमुख्याध्यापक कम केंद्र अधीक्षक इम्तियाज आलम यांचा मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केला आहे. ओएसिस स्कूलमधूनच पेपर फुटल्याचा संशय एजन्सीला आहे.