संग्रहित छायाचित्र
बंगळुरू : काँग्रेस नेते आणि कर्नाटक सरकारचे गृहनिर्माण मंत्री जमीर अहमद यांनी केंद्रीय मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांच्यावर वांशिक टिप्पणी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. एका जाहीर सभेला संबोधित करताना जमीर अहमद यांनी कुमारस्वामी यांना ‘कालिया कुमारस्वामी' असा उल्लेख केला. अहमद यांच्या विधानावरून कर्नाटकचे राजकारण चांगलेच तापले आहे. जमीर अहमद हे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत. चामराजपेट मतदारसंघातून ५ वेळा आमदार राहिलेले जमीर अहमद हे अल्पसंख्याक व्यवहार खात्याचे प्रभारी आहेत.
नुकतेच भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेले नेते सी. पी. योगेश्वर यांच्याबद्दल जमीर अहमद बोलत होते. यावेळी जमीर अहमद म्हणाले, 'काँग्रेसच्या काही नेत्यांशी मतभेद झाल्यामुळे ते (योगेश्वर) बसपमध्ये दाखल झाले. अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली आणि दुसरा पर्याय नसताना, 'कालिया' कुमारस्वामी हे भाजपपेक्षा जास्त धोकादायक आहेत असे वाटल्याने त्यांना जनता दलात जाण्याची इच्छा नाही म्हणून ते भाजपमध्ये दाखल झाले. आता आमच्या पक्षाचे उमेदवार सी. पी. योगेश्वर यांची ही घरवापसी आहे.
अहमद यांच्या या विधानानंतर आता कुमारस्वामी यांच्या जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाने (जेडीएस) आक्रमक भूमिका घेतली आहे. जेडीएसने ट्विटरवर पोस्ट करत 'जमीर अहमद यांनी चन्नापटना पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान वांशिक अपशब्द वापरले. केंद्रीय मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांना जमीर अहमद खान यांनी उर्दूमध्ये 'कालिया कुमारस्वामी' (ब्लॅक कुमारस्वामी) म्हणत त्यांचा अपमान केला. असे करून, त्यांनी कृष्णवर्णीय लोकांचा वांशिक अपमान केला आहे आणि वांशिक भेदभाव केला आहे. त्यांच्या तोंडून येणारे हे वांशिक द्वेषाचे शब्द अक्षम्य आहेत, अशा शब्दात टीका केली आहे.
तसेच जेडीएसने राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वरा आणि रामनगर पोलिसांना या प्रकरणी कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. जमीर अहमद यांच्यावर जातीय अत्याचार, जातीयवाद आणि शांतता बिघडवण्याचा प्रयत्न अशा गुन्ह्याखाली पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी जेडीएसने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली आहे.
यांचे वर्णन कसे कराल?
जमीर अहमद यांची काळ्या रंगावरून केलेली टीका अपमानास्पद आहे. कुमारस्वामी यांना काळे म्हणणारे जमीर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, कर्नाटकचे मंत्री प्रियांका खर्गे, एच.सी. महादेवप्पा, सतीश जरकीहोळी के एच मुनियप्पा आणि रहीम खान यांना काळ्या रंगाचे म्हणण्याचे धाडस दाखवतील का? असा सवाल जेडीएसने एक्सवर उपस्थित केला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.