भूत पाहण्यासाठी झाली गर्दी
#कोलकाता
पश्चिम बंगाल म्हटले की लोकांना काली माता आणि काळी जादू आठवते. मात्र याच राज्यात एका ठिकाणी दरवर्षी भुतांची पूजा करण्याची परंपरा पाळली जाते. लोक आवर्जून हजेरी लावत भुतांची पूजा करतात, त्यांना आवडतील असे पदार्थ शिजवले जातात आणि त्याचा प्रसाद सर्वजण खातात. फुलिया तालतळा येथे नुकतेच भूत पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती.
दरवर्षी वैशाख महिन्यात भूतपूजा केली जाते. फुलिया तालतळा येथील 'भूत पूजे'निमित्त जत्राही भरते. या जत्रेत फुलियासह शांतीपूर, राणाघाट आणि हबीबपूर येथील अनेक लोक सहभागी होतात. ही 'भूतपूजा' बांगलादेशातही सर्रास केली जाते, पण १९५० ते १९५२ च्या फाळणीदरम्यान अनेक लोक पूर्व पाकिस्तानातून आले आणि फुलिया भागात राहू लागले. भारतात आल्यानंतर तेथील लोकांनी येथेही तीच प्रथा पाळायला सुरुवात केली. सध्या बांगलादेशात भूतपूजेची ही प्रथा जवळजवळ नाहीशी झाली आहे.
अशी असते पूजेची पद्धत
या पूजेची सुरुवात चैत्र महिन्याच्या सुरुवातीपासून होते. संन्यासी शिवस्तोत्र म्हणत सर्व परिसराला प्रदक्षिणा घालतात. तांदूळ, कडधान्य इत्यादींचा समावेश असलेला 'भुक्ता' वेगवेगळ्या ठिकाणांहून गोळा केला जातो आणि दिवसाच्या शेवटी ते एका जागी बसून त्या सर्व गोष्टी शिजवून खातात. दरवर्षी स्थानिक रहिवासी स्वतःच्या हाताने भुताची मूर्ती बनवतात. या मूर्तीला डोके, मान नसते. पण, डोळे, नाक, तोंड इत्यादी अवयव शरीराच्या थोड्या खालच्या बाजूला असतात. जमिनीवर विसावलेल्या या मूर्तीची वर्षाच्या सुरुवातीला पूजा केली जाते.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ही पूजा पाचव्या शतकात एका यादव संन्याशाच्या हातून सुरू झाली. वर्षाच्या सुरुवातीला या पूजेभोवती जत्रा भरते. 'भूतपूजे'मध्ये स्थानिकांची गर्दी जमा होते. पण, या उत्सवात धूमकेतूच्या पुतळ्याची पूजा का केली जाते याचा खुलासा कोणीही करू शकलेले नाही. या पूजेचे नेमके कारण कोणीही सांगू शकत नाही, पण 'भूतपूजा' ही सर्वसाधारणपणे शंकराला प्रसन्न करण्यासाठी केली जाते, असे मानले जाते. वाईट ऊर्जेपासून मुक्त होण्यासाठी आणि चांगल्या ऊर्जेचे आवाहन करण्यासाठी ही पूजा बंगाली नववर्षाच्या सुरुवातीला केली जाते. वृत्तसंस्था