‘...तर नवऱ्यांना उपाशी ठेवा’
#नवी दिल्ली
नवरा मोदी मोदी करत असेल तर त्यांना जेवण देऊ नका. मग बघा ते कसे ताळ्यावर येतील. सर्वसामान्यांचे जगणे सुसह्य करणाऱ्या पक्षाला मतदान केले पाहिजे, हे त्यांच्या लक्षात येईल, असा अजब सल्ला आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महिलांना दिला आहे. त्यांच्या या सल्ल्यावर वादंग माजण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आली असल्यामुळे सध्या राजकीय नेत्यांकडून सभा, मेळावे, भेटीगाठी, बैठकांचा धडाका सुरू आहे. आपल्या पक्षाची संघटना आणखी मजबूत करण्यासाठी आणि लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त आपल्या पक्षांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी नेते मंडळींनी कंबर कसली आहे. यासाठी घेण्यात येत असलेल्या सभांमधून मतदारांना मोठी आश्वासनेही देण्यात येत आहेत, तर या माध्यमातूनच अनेकदा आरोप-प्रत्यारोप करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना ‘आप’चे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महिला मतदारांना एक अजब सल्ला दिला आहे. नवरा मोदी-मोदी म्हणत असेल तर त्याला जेवण देऊ नका, असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी महिला मतदारांना केले. त्यांच्या या विधानाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. या विधानावरून सत्ताधारी भाजपाचे नेते केजरीवाल यांची चांगलीच शाळा घेण्याची शक्यता आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाच्या वतीने शनिवारी (९ मार्च) एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही महिलांचा सत्कारही करण्यात आला. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आप’ने प्रचाराचा नारळही यावेळी फोडला. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी या कार्यक्रमाला संबोधित करताना विविध विषयांवर भाष्य करत भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. केजरीवाल म्हणाले, आता आपल्या घरातील भाऊ, वडील, पतीसह आपल्या परिसरातील व्यक्तींना पटवून देण्याची गरज आहे की, आपल्या फायद्यासाठी जे राजकीय पक्ष काम करत आहेत, त्याच पक्षाला मतदान द्या. हे पटवून देण्याची जबाबदारी महिलांची आहे. पण तुमचा नवरा जर मोदी-मोदी बोलत असेल तर त्याला जेवण देऊ नका. त्यामुळे त्यांना पत्नीने जे सांगितले, त्याचे पालन करावे लागेल, असेही केजरीवाल म्हणाले.