तवांग मठातील संमेलनाने भारताचा चीनला शह
#नवी दिल्ली
अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टर येथे जेमीथांग येथील मठावर डोळा असणाऱ्या चीनला शह देण्यासाठी भारताने सोमवारी (१७ एप्रिल) बौद्ध परंपरेचे एक दिवसीय राष्ट्रीय संमेलन आयोजित केले. या संमेलनाच्या माध्यमातून भारताने चीनला शह दिला आहे. कारण जेमीथांग मठाशेजारी वास्तव्यास असणारा मोनपा आदिवासी समाज तिबेटच्या बौद्ध धर्माचा पुरस्कार करतात. चीनने या आदिवासींच्या श्रद्धास्थानावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे स्थानिकांनीही या संमेलनात सहभागी होत चीनला आपला विरोध दर्शवला आहे.
चीनने अरुणाचल प्रदेशच्या ११ गावांचे नामकरण करण्याचा प्रयत्न केला होता. यावरून भारत आणि चीन यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. चीनला नामोहरम करण्यासाठी भारताकडून विविध उपाय आखले जात आहेत. याचा एक भाग म्हणून जी-२० ची बैठकही लेह येथे आयोजित करण्यात आली. याशिवाय तवांग येथे बौद्ध धर्माच्या अभ्यासकांचे राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात आले. या संमेलनात मुख्यमंत्री पेमा खांडू सुद्धा उपस्थित होते. महत्त्वाचे म्हणजे चीनचा ज्या मठावर डोळा आहे त्याच गावात हे संमेलन आयोजित करण्यात आल्याने भारताने चीनला सूचक इशारा दिला आहे.
अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टर येथे जेमीथांगमध्ये गोरसाम स्तूप येथे नालंदा बौद्ध परंपरेचे एक दिवसीय राष्ट्रीय संमेलन सोमवारी आयोजित करण्यात आले होते. हिमालयीन क्षेत्रात एवढ्या मोठ्या संख्येने बौद्ध नेत्यांनी एकत्र येणे ही फार दुर्मीळ घटना मानली जात आहे. ज्या जेमीथांग गावात हे संमेलन झाले ते गाव भारत-चीन सीमेतील शेवटचे गाव आहे. या संमेलनात जवळपास ६०० बौद्ध प्रतिनिधी उपस्थित होते. हिमालय क्षेत्रात बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
येथे असलेल्या तवांग मठामुळे हे संमेलन गाजले. अरुणाचलच्या तवांग येथे तिब्बती बौद्ध धर्माचा दुसरा मोठा मठ आहे. पाचवे दलाई लामा यांच्या सन्मानार्थ १६८०-८१ मध्ये मेराग लोद्रो ग्यामत्सो यांनी या मठाची स्थापना केली होती. तवांग मठ आणि तिब्बतच्या ल्हासा येथील मठाला ऐतिहासिक संदर्भ आहेत. येथील मोनपा आदिवासी समाज तिब्बती बौद्ध धर्माचा पुरस्कार करते. मात्र, चीनकडून ही संस्कृती मिटवण्याचा प्रयत्न होत आहे. येथील तिब्बती बौद्ध धर्माची संस्कृती नष्ट केल्यास ही जागा आपल्या ताब्यात येईल, अशी चीनची धारणा आहे. म्हणूनच, या गावात चिनी नागरिकांच्या वस्त्या उभारल्या जात आहेत. मात्र तवांगमधील हे मठ ताब्यात घेतल्याशिवाय येथील संस्कृती नष्ट करता येणार नाही, अशी चीनची मानसिकता आहे. म्हणूनच चीनचा या भागाकडे अधिक डोळा आहे.
वृत्तसंस्था