पोपट ओरडला म्हणून खुनी सापडला
#आग्रा
आग्रा शहरातील एका पत्रकाराच्या घरी दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी त्यावेळी पत्रकाराच्या पत्नीची हत्या केली होती. चोर-दरोडेखोरांना पकडण्याचे काम स्वाभाविकपणे पोलिसांचे असते. मात्र या प्रकरणी एका पोपटाने दरोडेखोरांना आणि खुन्याला पकडण्यासाठी पोलिसांना मदत केली आहे.
पत्रकार विजय शर्मा यांच्या घरी २० फेब्रुवारी २०१४ मध्ये दरोडा पडला होता. दरोड्यादरम्यान शर्मा यांच्या पत्नी नीलम शर्मा यांची हत्या झाली. मात्र शर्मा यांनी आपल्या घरात एक पोपट पाळला होता. या पोपटाच्या ओरडण्यामुळे पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोपट घेत असलेल्या एकाच नावामुळे विजय शर्मा यांना संशय आला आणि यातूनच पुढे हत्येचा उलगडा झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली. घटनेच्या तब्बल नऊ वर्षांनंतर आरोपीला जन्मठेप सुनावण्यात आली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पोपटाच्या ओरडण्यावरून शर्मा यांनी आपल्या भाच्याची चौकशी करण्याची विनंती पोलिसांना केली होती.
पोलीस चौकशीमध्ये त्यांचा भाचा आशू याने आपला मित्र रॉनीच्या मदतीने नीलम यांची हत्या केल्याची कबुली दिली. या प्रकरणात शनिवारी (२५ मार्च) विशेष न्यायाधीश मोहम्मद रशीद यांनी आशू आणि त्याचा मित्र रॉनी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान आशू आणि रोनीला नीलम यांचा खून करायचा होता, त्यासाठी त्यांनी दरोड्याचा बनाव रचला असल्याचे चौकशीतून समोर आले आहे.
वृत्तसंस्था