Parliament : संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार

संसदेचे पावसाळी अधिवेशन गुरुवार, २० जुलैपासून सुरू होत असून राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करणे आणि अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणावर चर्चा, मणिपूरमधील वांशिक हिंसाचार, ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप, दिल्लीसंदर्भातील केंद्र सरकारचा अध्यादेश आदी प्रश्नांवर हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 20 Jul 2023
  • 12:22 am
संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार

संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार

राहुल यांचे सदस्यत्व, अदानी, मणिपूर हिंसाचार, ब्रिजभूषण, पूरस्थिती आदी प्रश्नी विरोधक आक्रमक

#नवी दिल्ली

संसदेचे पावसाळी अधिवेशन गुरुवार, २० जुलैपासून सुरू होत असून राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करणे आणि अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणावर चर्चा, मणिपूरमधील वांशिक हिंसाचार, ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप, दिल्लीसंदर्भातील केंद्र सरकारचा अध्यादेश आदी प्रश्नांवर हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे अधिवेशन संसदेच्या जुन्या इमारतीतच होणार आहे.    

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक जोरदार तयारीला लागले आहेत. विरोधकांनी काल बंगळुरू तर सत्ताधाऱ्यांनी दिल्लीत बैठक घेतली.

विविध प्रश्नांमुळे पावसाळी अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधक सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेणार आहेत. यासोबतच विरोधी पक्ष महागाई, मणिपूर हिंसाचार, बालासोर रेल्वे अपघात, उत्तरेतील पुराचे संकट या मुद्द्यांवरून सरकारवर निशाणा साधू शकतात. संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही गदारोळ झाला होता. एकीकडे सत्ताधारी पक्ष आवश्यक विधेयके मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. दुसरीकडे, विरोधक मणिपूर हिंसाचार, रेल्वे सुरक्षा, दरवाढ आणि अदानी प्रकरणावर जेपीसी स्थापन करण्याच्या मागणीसह इतर मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील.

अधिवेशनाच्या एक दिवस अगोदर बुधवारी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.  बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय सरकारचे मंत्री उपस्थित होते. संसदीय कामकाज मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही बैठक जुन्या संसदेच्या ग्रंथालयात दुपारी ३ वाजता झाली. 

लोकसभा सचिवालयाच्या माहितीनुसार प्रस्तावित समान नागरी कायद्यासह २१ नवीन विधेयके अधिवेशनात मांडली जाऊ शकतात आणि मंजूर केली जाऊ शकतात. राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी यापूर्वी  १८ जुलै रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीमुळे ती पुढे ढकलावी लागली.

पावसाळी अधिवेशन ११ ऑगस्टपर्यंत चालणार असून या काळात दोन्ही सभागृहांच्या एकूण १७ बैठका प्रस्तावित आहेत. सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे की अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयके मांडली जाणार आहेत, अशा प्रकारे सर्व पक्षांनी अधिवेशन चालवण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. सरकार नियम आणि प्रक्रियेनुसार कोणत्याही विषयावर चर्चा करण्यास तयार  आहे.

१८ जुलै रोजी दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी आघाडीवर  टीका केली होती. ते म्हणाले होते की, विरोधक एकत्र येऊ शकतात, परंतु पास होऊ शकत नाहीत. केरळमध्ये डावे आणि काँग्रेस एकमेकांच्या रक्ताचे तहानलेले आहेत, पण बंगळुरूमध्ये तेच लोक एकमेकांचे हात धरून हसत होते.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest