येते पाच दिवस देश तापणार
#नवी दिल्ली
येत्या पाच दिवसांत देशाच्या बहुतेक भागातील तापमान वाढणार असून तापमानात २ ते ४ डिग्री सेल्सियसची वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
याबाबत भारतीय हवामान विभागाचे राष्ट्रीय सरसंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, आगामी पाच दिवसांत देशातील बहुतेक भागातील साधारण तापमान २ ते ४ डिग्री सेल्सियसने वाढेल. येत्या दोन दिवसांत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशातील अनेक भागात वादळी वारे आणि वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळी पावसाच्या काळात सोसाट्याचे वारे वाहतील. त्यानंतरच्या काळात त्या भागातील तापमानात काही प्रमाणात घसरण होईल.
या अगोदर उत्तर-पश्चिम भारत आणि द्विपखंडीय भागाचा अपवाद केला तर एप्रिल ते जून या काळात देशाच्या बहुतेक भागातील तापमान सरासरीपेक्षा काही प्रमाणात अधिक असेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला होता. त्या वेळच्या अंदाजात असे म्हटले होते की, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, हरयाणा या भागात नेहमीच्या तुलनेत उष्ण दिवसांची संख्या अधिक असेल. हवामानातील बदलामुळे जागतिक पातळीवर तापमानात वाढ होत आहे. तसेच हवामानाच्या बदलामुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक संकटांची संख्या किंवा तीव्रता आता दिवसेंदिवस वाढत आहे.