लोकसभेचे अध्यक्षपद एनडीएकडेच
नवी दिल्ली : अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली. संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी या संदर्भातील घोषणा केली. आवाजी मतदानाने ही निवड करण्यात आली. सत्ताधारी आघाडीच्या बाजूने संख्याबळ असल्याने एनडीएचे उमेदवार अध्यक्षपद राखू शकले.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ओम बिर्ला यांचे पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अभिनंदन केले. मोदी आणि गांधींनी अध्यक्षांना त्यांच्या खुर्चीपर्यंत सोबत केली आणि त्यांच्या साक्षीने ओम बिर्ला यांनी खुर्ची स्वीकारली. बिर्ला यांचा गेल्या टर्ममध्ये अध्यक्ष होण्याचा अनुभव त्यांना देशाला आणखी मार्गदर्शन करण्यास मदत करेल, असे पंतप्रधान मोदी यांनी आज सांगितले. दरम्यान, मंगळवारी (२५ जून) संध्याकाळी सत्ताधारी पक्ष आणि विरोधक एकमत होऊ न शकल्याने त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. इंडिया आघाडीच्या वतीने के. सुरेश यांनी अर्ज केला होता. लोकसभाध्यक्षांची नियुक्ती बिनविरोध करण्यासाठी भाजपच्या वतीने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांच्यावर विरोधकांशी बोलणी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. राजनाथ सिंह यांनी इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी सोमवारी फोनवरून संपर्क केला होता व सहमतीने लोकसभाध्यक्षांची निवड करण्याची विनंती केली होती. राजनाथ सिंह यांच्या प्रस्तावावर काँग्रेससह इंडियातील घटक पक्षांनी सहमतीही दाखवली होती. मात्र उपाध्यक्षपदाच्या मुद्द्यावर ही बोलणी फिसकटली.
स्मितहास्य आणि हस्तांदोलन
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप आणि काँग्रेसमध्ये विस्तवही जात नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसवर तुटून पडत होते, तर काँग्रेस नेते राहुल गांधी हे सुद्धा भाजपवर तुटून पडत होते. त्या आधी संसदेतही राहुल गांधी आणि मोदी यांच्यात अनेकदा चकमकी उडाल्या. गेल्या दहा वर्षांत हे दोन्ही नेते संसदेत हास्यविनोद करताना कधीच दिसले नाहीत, पण आजचा प्रसंग काही खास होता. आज हे दोन्ही नेते एकमेकांना भेटले. स्मितहास्य केले आणि हस्तांदोलनही केले. बऱ्याच वर्षांनंतर संसदेत हे चित्र पाहायला मिळाले. या दोन्ही नेत्यांना एकत्र पाहून इतर खासदारांचेही चेहरे फुललेले दिसले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे ओम बिर्ला यांना लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत घेऊन गेले. यावेळी मोदी आणि राहुल गांधी पहिल्यांदाच समोरासमोर आले. दोघांनीही एकमेकांशी हस्तांदोलन करत स्मितहास्य केले. दोन्ही नेत्यांनी जेव्हा एकमेकांशी हस्तांदोलन केलं तेव्हा सर्वच खासदार भारावून गेले. खासदारांनी टाळ्या वाजवून दोन्ही नेत्यांचे स्वागत केले. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी ओम बिर्ला यांना सन्मानाने अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत नेले. हे चित्र लोकसभेसाठी अत्यंत अनोखे होते.
राहुल गांधींनी केले अभिनंदन
आम्हाला विश्वास आहे की विरोधी पक्षाला बोलण्याची परवानगी देऊन, आम्हाला भारतातील लोकांचे प्रतिनिधित्व करण्याची परवानगी देऊन, तुम्ही भारतीय राज्यघटनेचे रक्षण करण्याचे तुमचे कर्तव्य पार पाडाल. मी पुन्हा एकदा तुमचे आणि सर्व सदस्यांचे अभिनंदन करू इच्छितो, असे म्हणत राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले.
खूप काही शिकायला मिळेल
ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केले. तुम्हाला दुसऱ्यांदा या पदावर बसायला मिळाले ही अत्यंत सन्मानाची बाब आहे. सभागृहाच्या वतीने मी तुमचे अभिनंदन करतो. पुढील पाच वर्षे आम्हाला मार्गदर्शन मिळेल. तुमच्याकडून तरुण आणि नवीन खासदारांना खूप काही शिकायला मिळेल. तुमच्या चेहऱ्यावरचे प्रेमळ हास्य या सभागृहाचा आनंद द्विगुणीत करेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
उपाध्यक्षपदासाठी काँग्रेस आग्रही, मात्र मित्र पक्षांनाही हवे आहे मानाचे पद
लोकसभाध्यक्षपदाची निवड बिनविरोध होईल त्यासाठी काँग्रेससह विरोधी पक्ष भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा देतील, असे निश्चित झाले होते. पण लोकसभेचे उपाध्यक्षपद काँग्रेसला दिले जावे, अशी मागणी काँग्रेसचे संघटना महासचिव व खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी केली. वास्तविक, उपाध्यक्षपद काँग्रेसला देण्याची तयारीही भाजपने दाखवली होती. मात्र, तसे उघड आश्वासन देण्यास भाजपने नकार दिला. विरोधकांचे म्हणणे मान्य केले जाऊ शकते, पण विरोधकांनी अटी घालू नये, असे भाजपचे म्हणणे होते. पण वेणुगोपाल यांनी तडजोड करण्यास नकार दिल्याने भाजप व काँग्रेसमधील बोलणी अपयशी ठरली. दरम्यान, आता अध्यक्षपद भाजपकडे गेल्याने उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार हे स्पष्ट आहे. मात्र हे पद काँग्रेसला मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. कारण इंडिया आघाडीतील मित्र पक्षांनाही संसदेत मानाचे पद हवे आहे.