संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली: नीट परीक्षेचा (NEET Exam) निकाल जाहीर झाल्यानंतर देशभरात मोठा गोंधळ बघायला मिळत आहे. अनेक विद्यार्थ्यांकडून नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जात आहे. विद्यार्थ्यांमधील रोष वाढल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. १२ जूनपासून सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी सुरू आहे. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने (Suprime Court of India) केंद्र सरकार आणि परीक्षा प्रक्रिया राबवणाऱ्या एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीला खडेबोल सुनावले आहेत. परीक्षा प्रक्रियेतील ०.१ टक्का निष्काळजीपणाही पूर्ण परीक्षा प्रक्रियेला धक्का देण्यासाठी पुरेसा आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.
वैद्यकीय प्रवेशासाठी देशपातळीवर ‘नीट’ ही परीक्षा घेण्यात येत असते. नीट ( एनईईटी) म्हणजेच नॅशनल एलिजिबिटी कम एन्ट्रन्स टेस्ट, ही वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी द्यावी लागणारी प्रवेश परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेतली जाते. आज न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाने एनटीए आणि केंद्र सरकारला नोटीस देताना सांगितले की, थोडासाही निष्काळजीपणा संपूर्ण परीक्षा प्रक्रियेच्या पावित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतो. या परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थी जीवतोड मेहनत करतात. अतिशय अवघड मानल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ खेळण्याचा प्रयत्न होत आहे. विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाहीत, असेही निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश विक्रम नाथ यांनी एनटीएला या प्रकरणी लवकरात लवकर तोडगा काढण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणाची आता पुढील सुनावणी ८ जुलै रोजी होणार आहे. शिवांगी मिश्रा आणि एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या नऊ अन्य उमेदवारांनी दाखल केलेल्या याचिकेवर उन्हाळी सुट्टीकालीन न्या. विक्रम नाथ आणि न्या. अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या आरोपावर केंद्र सरकार आणि ‘एनटीए’ला उत्तर द्यायला सांगितले. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या देशभरातील लाखभर जागांसाठीच्या प्रवेशासाठी ‘नीट’ होते. यंदा या परीक्षेला सुमारे २३ लाख विद्यार्थी बसले होते. यंदाच्या परीक्षेत ७२० पैकी ७२० गुण मिळवलेल्यांची संख्या ६७ आहे. हरियाणातील एकाच केंद्रावरील सहा-सात जणांना पैकीच्या पैकी गुण मिळाले असल्याने पेपरफुटीची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचप्रमाणे यंदा नीटमधून पात्र ठरणाऱ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत एकदम २ लाखांनी वाढल्यानेही त्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. शिवाय, काही विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेल्याचे कारण सांगून त्यांना अधिकचे गुण दिले गेले असून, ते देण्यामागे काहीही विशिष्ट तर्क नाही, असाही आरोप याचिकेद्वारे करण्यात येत आहे.