मोदींना रोखणे हाच एकमात्र अजेंडा
#बंगळुरू
बंगळुरू येथे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या आघाडीची बैठक मंगळवारी झाली. पंतप्रधानपदाच्या दावेदारीमुळे या महाआघाडीसाठीचे प्रयत्न निष्फळ ठरू नयेत म्हणून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे यांनी काँग्रेसला पंतप्रधानपदात रस नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता नरेंद्र मोदी यांना रोखणे हाच विरोधकांचा एकमेव उद्देश असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. यावेळी देशातील २६ विरोधी पक्ष एकत्र जमले होते. महाराष्ट्रातून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार या बैठकीला उपस्थित होते.
काँग्रेस पंतप्रधानपदासाठी इच्छुक नाही, असे सांगत खर्गे यांनी विरोधकांना केवळ यासाठी मतभेद होता कामा नयेत, असेही सांगितले आहे. खर्गे म्हणाले, मी स्टॅलिन यांच्या वाढदिवसानिमित्त चेन्नईत आयोजित कार्यक्रमात यापूर्वीच बोललो आहे की, काँग्रेस सत्ता मिळवण्यासाठी आणि पंतप्रधानपदासाठी इच्छुक नाही. या बैठकीत आमची भावना ही स्वतःसाठी सत्ता मिळवणे अशी नाही. आमची भावना ही संविधानाचे संरक्षण करणे, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाचे संरक्षण करणे आहे. आमच्यापैकी काही लोकांमध्ये मतभिन्नता आहे. पण ही राज्यस्तरावर असून ती वैचारिक स्तरावर नाही. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या धोरणांमुळे ज्यांना त्रास झाला आहे त्यांच्यापुढे ही समस्या खूप मोठी नाही, खर्गेंनी या बैठकीत म्हटले आहे.
यूपीए नव्हे तर 'INDIA'
देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्ष या आघाडीत सामील झाले असून या आघाडीचे नाव निश्चित करण्यात आले आहे. नावाची अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. बंगळुरू येथे विरोधकांच्या वतीने दोन दिवसीय बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. याच बैठकीत विरोधकांच्या आघाडीला INDIA (इंडिया) असे नाव देण्यात आले आहे. अर्थात आय - इंडियन, एन - नॅशनल, डी -डेमोक्रॅटिक, आय - इन्क्लुझिव्ह, ए -अलायन्स असे हे नाव आहे. याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. लवकरच घोषणा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या नावाचा अर्थ भारतीय राष्ट्रीय लोकशाही सर्वसमावेशक आघाडी असा असू शकतो. मात्र याबाबत अद्याप स्पष्टता नाही. बंगळुरू येथील विरोधकांच्या बैठकीचा आजचा दुसरा दिवस आहे. या बैठकीत २६ विरोधी पक्ष उपस्थित होते. याच बैठकीत आगामी काळातील नियोजन निश्चित करण्यात आले आहे.
विरोधकांची पहिली बैठक पाटणा येथे पार पडली. त्यानंतर आज दुसरी बैठक बंगळुरूत होत आहे. विरोधकांच्या ‘इंडिया’ची पुढची बैठक महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे होईल. आम्ही आता २६ पक्ष एकत्र आलो आहोत. आधीच्या बैठकीत २० पक्ष आले होते. पाटणा येथे येणं काही पक्षाच्या नेत्यांना शक्य झालं नव्हतं. त्यामुळे तेव्हा तिथे तुम्हाला कमी पक्ष दिसले. परंतु आता आम्ही २६ पक्ष एकत्र आल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपचे धाबे दणाणले आहे. आमची ही बैठक पाहून त्यांनी ३० पक्षांची बैठक बोलावली आहे.