संग्रहित छायाचित्र
लखनौ : अलाहाबाद उच्च न्यायालयाने धर्मांतरावर कठोर टीका केली. उत्तर प्रदेशमध्ये निरपराध गरीब लोकांना दिशाभूल करून ख्रिश्चन बनवले जात आहे. असेच धर्मांतर होत राहिले तर एक दिवस भारतातील बहुसंख्य लोकसंख्या अल्पसंख्याक होईल. धर्मांतर करणाऱ्या धार्मिक मेळाव्यांवर तत्काळ बंदी घालावी. अशा घटना संविधानाच्या विरोधात आहेत, असे म्हणत न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी एका हिंदू व्यक्तीचे ख्रिश्चन धर्मांतर केल्याचा आरोप असलेल्या उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथील रहिवासी कैलासचा जामीन अर्ज फेटाळला.
भारतीय राज्यघटनेचे कलम २५ धर्माच्या प्रचाराला परवानगी देते, परंतु धर्मांतराला परवानगी देत नाही. उत्तर प्रदेशात धार्मिक कार्यक्रमांतून निरपराध गरिबांची दिशाभूल करून त्यांना ख्रिश्चन बनवले जात असल्याचे समोर आले आहे. कैलास यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. अशा स्थितीत त्यांची जामिनावर सुटका होऊ शकत नसल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती रोहित रंजन अगरवाल यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी न्यायमूर्तींनी धर्मांतरावर मत मांडले. “जर अशाच प्रकारे धर्मांतर घडू दिले, तर एक दिवस या देशातले बहुसंख्याक हे अल्पसंख्य झालेले असतील. धर्मांतरासाठी होणारे असे कार्यक्रम किंवा मेळावे तातडीने थांबायला हवेत, असेही न्यायमूर्ती रोहित रंजन अगरवाल यांनी नमूद केले.
उत्तर प्रदेशात सुरू आहेत धर्मांतराचे प्रयत्न
उत्तर प्रदेशातील नोएडा येथे दोन वर्षांपूर्वी मूकबधिर मुलांच्या धर्मांतराचे प्रकरण समोर आले होते. दहशतवाद प्रतिबंधक विभागाने (एटीएस) आरोपी मौलाना उमर आणि जहांगीरला अटक केली होती. यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जो कोणी या कामात सहभागी आहे, या सर्वांवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा आणि गुंडगिरी कायदा लादला पाहिजे. त्यांची मालमत्ताही जप्त करण्यात यावी. प्रत्येक पैलू तपशीलवार तपासले पाहिजे, असे आदेश दिले होते.
४०० जणांची धर्मांतराविरोधात तक्रार
२८ ऑक्टोबर २०२२ रोजी मेरठमध्ये धर्मांतराचे एक मोठे प्रकरण समोर आले. मंगतापूरम कॉलनीतील सुमारे ४०० लोक पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचले. त्यांना हिंदूमधून ख्रिश्चन बनवण्यास भाग पाडले जात असल्याची तक्रार होती. लॉकडाऊन दरम्यान काही ख्रिश्चन लोकांनी कॉलनीतील रहिवाशांना मदत केल्याचा आरोप होता. आता ते धर्मांतरासाठी दबाव आणत आहेत. त्यांना मंदिरात जाण्यास आणि पूजा करण्यास मनाई केली जात आहे. अनेक घरांमधून हिंदू देवी-देवतांचे फोटो काढून टाकण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी ९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
धर्मांतर केले, पैसे दिले
हमीरपूर येथील रामकली प्रजापती यांनी एफआयआर दाखल केला होता. ते म्हणाले होते, त्यांचा भाऊ मानसिक आजारी होता, कैलास त्याला एका आठवड्यासाठी दिल्लीला घेऊन गेला. म्हणाला- उपचार करून गावी आणू, पण आठवडाभरातही तो परतला नाही. खूप दिवसांनी तो भावासोबत परत आला. मग तो आपल्या भावासह गावातील अनेक लोकांना घेऊन दिल्लीला गेला. तिथल्या एका कार्यक्रमात सगळ्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यात आला. त्याबदल्यात पैसे दिले.