...म्हणून त्यांनी दाखल केला कुत्र्याविरोधात गुन्हा
#विजयवाडा
राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतात. त्यावरून होणारा गदारोळ आपल्या प्रत्येकाच्याच परिचयाचा असतो. मात्र अलीकडील काळात पाळीव प्राणीही राजकीय कार्यकर्त्यांच्या दोषारोपाला बळी पडू लागले आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. आर. जगन मोहन रेड्डी यांचे पोस्टर फाडल्याबद्दल एका कुत्र्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. घराच्या भिंतीवर लावलेले पोस्टर कुत्र्याने फाडल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
विरोधी तेलुगु देसम पार्टीचा कार्यकर्ता असल्याचे सांगणाऱ्या दासरी उदयश्री यांनी उपहासाने या कुत्र्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुख्यमंत्र्यांचा अवमान केल्याप्रकरणी कुत्रा आणि त्यामागे असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी इतर काही महिलांसोबत केली आहे.
स्थानिक माध्यमांशी बोलताना दासरी यांनी सांगितले, ज्या जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाने राज्यातील १५१ विधानसभा जागा जिंकल्या आहेत, त्यांच्याबद्दल आपल्याला अतीव आदर आहे. अशा नेत्याचा अपमान आपण कसा सहन करणार? खरेतर या कुत्र्याने राज्यातील सहा कोटी जनतेला दुखावले आहे. हा केवळ आपल्या मुख्यमंत्र्यांचाच अपमान नाही, तर त्यांच्या १५१ आमदारांचा, त्यांना निवडून देणाऱ्या राज्यभरातील सर्वसामान्य जनतेचा अपमान आहे.
आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचा अपमान करणाऱ्या कुत्र्याला आणि कुत्र्याच्या मागे असणाऱ्यांना अटक करण्याची आम्ही पोलिसांना विनंती केली असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी जगन मोहन रेड्डी यांचा फोटो असलेले स्टिकर कुत्र्याने फाडल्याचा व्हीडीओ
व्हायरल झाला होता.वृत्तसंस्था