...म्हणून मुलीचा अधिकार नाकारता येणार नाही
हैद्राबाद: केवळ बहिणीची आर्थिक स्थिती उत्तम आहे म्हणून तिला पित्याच्या संपत्तीतील वाटा नाकारता येणार नसल्याचे स्पष्ट करत तेलंगणा उच्च न्यायालयाने या संदर्भात एका भावाने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. तसेच हुंडा म्हणून दिलेली रक्कम वडिलांच्या कमाईतील होती, त्यामुळे आता तिला वाटा नाकारावा, ही मागणी आणि युक्तिवादही नाकारला आहे.
एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या खासगी मालमत्तेवरून वाद झाल्याची अनेक प्रकरणे न्यायालयांमध्ये प्रलंबित असल्याचं पाहायला मिळत आहे. अशा प्रकरणांमध्ये मालमत्तेवर दावा सांगणारे अनेक प्रतिवादी तयार होत असल्याचंही दिसून येतं. अशाच एका प्रकरणात तेलंगणा उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी स्वत: कमावलेल्या संपत्ती वा मालमत्तेवर मुलींच्या अधिकाराबाबत न्यायालयाने हा निकाल दिला असून त्यावेळी न्यायालयाने वडिलांच्या कथित मृत्युपत्राचाही उल्लेख केला आहे.
वडिलांच्या मालमत्तेवर बहिणीने केलेल्या दाव्याच्या विरोधात एका भावाने तेलंगणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती एम. जी. प्रियदर्शिनी यांच्यासमोर ही सुनावणी झाली. भावाने ही याचिका दाखल करताना मयत वडिलांच्या मृत्युपत्राचा हवाला दिला होता. या मृत्युपत्रात बहिणीचा मालमत्तेवर कोणताही अधिकार नसेल, असे नमूद असल्याचा दावा भावाने केला होता. त्यासाठी बहिणीची चांगली आर्थिक स्थिती हे कारण देण्यात आल्याचाही युक्तिवाद भावाकडून करण्यात आला होता. दरम्यान, आपल्या निकालात न्यायालयाने मयत वडिलांचे मृत्युपत्र आणि त्यातील मुद्दा खोडून काढला. फक्त बहिणीची आर्थिक स्थिती चांगली आहे म्हणून तिला वडिलांच्या स्वकमाईच्या मालमत्तेमध्ये अधिकार नाकारता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले. याचिकाकर्त्या भावाने दावा केल्याप्रमाणे वडिलांचे मृत्युपत्र जरी खरे मानले तरी त्यातील मुद्द्यानुसार बहिणीचा मालमत्तेवरील अधिकार नाकारता येणार नाही, असेही न्यायालयाने आपल्या निकालपत्रात म्हटले आहे.
यावेळी याचिकाकर्त्या भावाने बहिणीच्या लग्नावेळी दिलेला हुंडा हा मालमत्तेतील तिचा हिस्साच होता, असा युक्तिवाद केला. मात्र, न्यायालयाने हा दावाही फेटाळून लावला. “बहिणीच्या लग्नात नेमका किती हुंडा दिला या संदर्भात कोणताही सबळ पुरावा न्यायालयासमोर येऊ शकलेला नाही. तसेच, हुंडा म्हणून जरी काही रक्कम वा इतर स्वरूपात संपत्ती देण्यात आली असली, तरी त्यामुळेही बहिणीचा वडिलांच्या स्वकमाईने जमवलेल्या मालमत्तेवरील अधिकार नाकारता येणार नाही”, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.