तिरंग्याच्या समर्थनार्थ दिल्लीत शीख एकटवले

खलिस्तानी नेता अमृतपाल सिंग याच्या विरोधात सुरू असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ इंग्लंडमध्ये लंडन आणि अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को येथे रविवारी खलिस्तानी समर्थकांनी निदर्शने केली. लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्तांच्या कार्यालयावरील राष्ट्रध्वज खाली उतरविण्यात आला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Tue, 21 Mar 2023
  • 12:08 pm
PuneMirror

तिरंग्याच्या समर्थनार्थ दिल्लीत शीख एकटवले

#नवी दिल्ली

खलिस्तानी नेता अमृतपाल सिंग याच्या विरोधात सुरू असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ इंग्लंडमध्ये लंडन आणि अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को येथे रविवारी खलिस्तानी समर्थकांनी निदर्शने केली. लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्तांच्या कार्यालयावरील राष्ट्रध्वज खाली उतरविण्यात आला. सॅन फ्रान्सिस्कोतील भारतीय उच्चायुक्त कचेरीवर हल्ला करण्यात आला. या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ शीख समुदायाने दिल्लीत एकत्र येऊन आवाज उठविला. खलिस्तानी समर्थकांच्या विरोधात फलक झळकावण्याबरोबर त्यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या गेल्या. भारत हमारा स्वाभिमान असल्याचे स्पष्ट करताना शीख नागरिकांनी आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान शीख समुदाय कधीही सहन करणार नसल्याचे जाहीर केले.

अमृतपाल सिंग याच्या विरुद्ध सुरू असलेल्या कारवाईची प्रतिक्रिया लंडनमध्ये रविवारी उमटली. खलिस्तानी समर्थक रविवारी लंडनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयावर पोहचले. तेथे त्यांनी प्रथम तोडफोड केली आणि त्यानंतर कार्यालयावरील ध्वज खाली उतरला. उच्चायुक्त घटनास्थळी पोहोचले तेव्हा निदर्शकांच्या हाती खलिस्तानी झेंडे असल्याचे आढळले. त्यांनी हातात घेतलेल्या फलकांवर, आम्हाला न्याय द्या, अशा घोषणा लिहिलेल्या होत्या. लंडनमधील घटनेची केंद्र सरकारने तातडीने दखल घेतली आणि दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तांना बोलावून तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला.  

एक शीख नागरिक म्हणाला की, भारतातील शांततेचे वातावरण बिघडावे यासाठी पकिस्तानची आयएसआय ही गुप्तचर संघटना कायम काम करत असते. शीख समुदायाने नेहमी आपल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान केला असून त्याचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही. वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest