सिद्दरामयांना कोलारमधून पक्षाने उमेदवारी नाकारली
#नवी दिल्ली
काँग्रेस पक्षाने कर्नाटक विधानसभेसाठी ४३ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून अपेक्षेप्रमाणे भाजपचे माजी नेते आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांना अथणी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तसेच माजी मुख्यमंत्री सिद्दरामया यांना कोलार मतदारसंघातून उमेदवारी दिली नसून तेथे जी. मंजुनाथ यांना उमेदवारी दिली आहे.
सिद्दरामया यांना वारुणा मतदारसंघातून या अगोदर उमेदवारी दिली आहे. त्यांना दुसरा मतदारसंघ म्हणून कोलार मतदारसंघ हवा होता. तसेच माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांचा मुलगा निवेदीत अल्वा याला कुमठा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. पक्षाने आतापर्यंत २०९ उमेदवार जाहीर केले आहेत. आतापर्यंत काँग्रेसने पहिल्या दोन याद्यांत १२४ आणि ४२ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. आता ४३ उमेदवार जाहीर केले असून काँग्रेसला आणखी १५ मतदारसंघातील उमदेवार जाहीर करावयाचे आहेत.
लिंगायत समाजावर पकड असलेले आणि तीन वेळा आमदार राहिलेले भाजपचे लक्ष्मण सावदी यांनी विधान परिषदेचा राजीनामा देऊन शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना बेळगावी जिल्ह्यातील अथणी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभेत पोर्न फिल्म पाहात असताना आढळल्याने सावदी वादात अडकले होते. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांचे जवळचे सहकारी म्हणून ते ओळखले जातात. वृत्तसंस्था