रेल्वे प्रवाशांना पेटवणाऱ्या युवकांवर खुनाचा गुन्हा
#थिरुअनंतपूरम
धावत्या रेल्वेतील प्रवाशांवर पेट्रोल शिंपडून आग लावणाऱ्या २७ वर्षीय युवकांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. रविवारी झालेल्या या घटनेत हा युवकही भाजला गेला आहे. रविवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास एलाथूर आणि कोईलांदी रेल्वे स्थानकांच्या दरम्यान अलाप्पुझा-कन्नूर एक्स्प्रेसच्या डी १ डब्यात हा धक्कादायक प्रकार घडला होता. पेट्रोल शिंपडून आग लावण्याचे कृत्य करणाऱ्या युवकाचे नाव शाहरुख सैफी असे आहे.
भाजल्याने जखमी झालेल्या सैफीवर सध्या कोझीकोडे मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. शुक्रवारी सकाळी जिल्हा सत्र न्यायाधीश एस. व्ही. मनीष यांनी कॉलेजला भेट दिली आणि सैफीला २८ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. येथून सैफीला जिल्हा तुरुंगातील वैद्यकीय सेलमध्ये हलवले जाईल. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सैफीची चौकशी झाल्यावर त्याच्यावर आणखी कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल करायचा याचा निर्णय घेतला जाईल. सध्या त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सैफी हा मूळचा दिल्लीचा असून त्याने लावलेल्या आगीमुळे एका मुलासह तीनजणांचा मृत्यू झाला. त्याने आग लावल्यावर रेल्वे डब्यात प्रचंड गोंधळ माजला आणि प्रवासी सैरावैरा धावू लागले. आग लावल्याने जखमी झालेल्या तिघांनी धावत्या रेल्वेतून रुळावर उडी मारली होती. या शाहरुखला अखेर महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात अटक करण्यात आली होती.