संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली: सध्याच्या जगात तरुण-तरुणी एकमेकांना भेटण्यासाठी ऑनलाइन डेटिंग अॅपचा वापर करतात. पण यातूनच फसवणुकीचे प्रकारदेखील उघडकीस येताना दिसतात. राजधानी दिल्लीमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. ज्यामुळे तरुणांना डेटिंग अॅप वापरताना भीती वाटू शकते. टिंडर अॅपच्या माध्यमातून तरुणाला कॅफेमध्ये बोलवायचे, तिथे आल्यावर त्याला धमकी द्यायची. त्यांची लूट करायची अशी लूट करणाऱ्यांची पॉलिसी होती. हे काम एकट्या तरुणीचे नव्हते, तर तिच्यासोबत रेस्टॉरंटचा मालक, तिथे काम करणारा मॅनेजर, रेस्टॉरंटचे कर्मचारीदेखील सहभागी असायचे.
एक २५ वर्षांची तरुणी डेटिंग अॅपवर मुलांना शोधायची. यानंतर त्यांना कोणत्या तरी बहाण्याने रेस्टॉरंटमध्ये बोलवायची. पुढे मग ठरल्याप्रमाणे खेळ सुरू व्हायचा. काही तरी कारण काढून मुलगी कॅफेतून बाहेर पडायची. मॅनेजर आधीच समोर बसलेला असायचा. तो फसवणूक झालेल्या तरुणाच्या हातात एक मोठे बिल द्यायचा. हे बिल लाखाच्या घरात असायचे. पीडित तरुणाने बिल देण्यास नकार दिला तर त्याला धमकावण्यात यायचे. त्याला एका खोलीत बंद केले जायचे. पीडित तरुण जोपर्यंत संपूर्ण बिल भरत नाही तोपर्यंत त्याला बाहेर जाऊ दिले जायचे नाही. २४ जून रोजी दिल्लीच्या शकरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच एक घटना घडली होती. ज्यामध्ये एका यूपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवाराने डेटिंग ॲप टिंडरवर एका मुलीशी मैत्री केली. वर्षा असे आरोपी मुलीचे नाव असून ती २५ वर्षांची आहे. 'माझा वाढदिवस आहे, आपण साजरा करूया' असे म्हणून वर्षाने तरुणाला लक्ष्मीनगर येथील ब्लॅक कॅफेमध्ये बोलावले. दोघे कॅफेमध्ये पोहोचले. त्याने काहीतरी स्नॅक्स मागवले. यानंतर दोन केकची ऑर्डर दिली. ज्यामध्ये वर्षाने फ्रूट वाईनचे चार शॉट घेतले. काही वेळ असाच निघून गेल्यानंतर काहीतरी कौटुंबिक कारण सांगून ठरल्याप्रमाणे वर्षाने तिथून पळ काढला. यानंतर कॅफेचा मॅनेजर पीडित तरुणाकडे आला. त्याने १ लाख २१ हजार रुपयांचे बिल त्याच्या हातात दिले. तरुणाने हे बिल नाकारले. ही रक्कम आपण खर्च न केल्याचे त्याने सांगितले. त्याने याला विरोध केला. पण मॅनेजरने त्याला धमकावले. ओलीस ठेवले आणि बिल भरण्यासाठी दबाव टाकला. यानंतर पीडित तरुणाने संपूर्ण बिल ऑनलाइन भरले. त्यानंतरच त्याला जाण्याची परवानगी देण्यात आली. या घटनेनंतर घाबरलेल्या तरुणाने दिल्ली पोलिसांची मदत घेतली. त्याने आपले म्हणणे पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी फसवणूक आणि गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. या तपासादरम्यान पोलिसांना हे रॅकेट असल्याची माहिती मिळाली.
पीडित तरुणाने पाठवलेली रक्कम कॅफेच्या मालकांपैकी एक असलेल्या ३२ वर्षीय अक्षय पाहवा याच्या अकाऊंटमध्ये पाठवण्यात आली. मुलीचे खरे नाव वर्षा नसून अफसान परवीन असल्याचे समोर आले. तिने डेटिंग ॲपवर वर्षा नावाने प्रोफाइल तयार केले होते. ती लोकांना टार्गेट करायची. तसेच फसवणूक करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये न्यायची. अफसान परवीनपासून सुरू झालेला खेळ मॅनेजर संपवायचा. यात ३० टक्के रक्कम अफसान परवीन या तरुणीला, ३० टक्के रक्कम मालकाला आणि ४० टक्के रक्कम मॅनेजर आणि उर्वरित कर्मचाऱ्यांमध्ये वाटली जायची. या घटनेतील आरोपी तरुणी सध्या फरार आहे. पोलीस अधिक त्यांचा अधिक तपास करत आहेत.