लोकशाही वाचवणे हे इंडिया आघाडीसमोरील एकमात्र उद्दिष्ट
#आग्रा
लोकशाही वाचवणे हेच आगामी निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीसमोरील सर्वांत मोठे आव्हान असल्याचे सांगत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशातून भाजपचा सफाया करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात काँग्रेसबरोबर आघाडी निश्चित झाल्यानंतर यादव यांनी काँग्रेसच्या 'भारत जोडो न्याय' यात्रेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी ‘भाजप हटवा, देश वाचवा’ अशी घोषणाही दिली.
उत्तर प्रदेशातील ८० जागांपैकी १७ जागा काँग्रेस लढवणार असून उर्वरित जागा समाजवादी पक्ष आणि इतर मित्रपक्ष लढवणार आहेत. काँग्रेस आणि ‘सप’ मधील जागावाटपाचा तिढा सुटल्यामुळे अखिलेश यादव आग्रा येथे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘भारत जोडो न्याय' यात्रेत सहभागी झाले. यावेळी त्यांनी जमलेल्या जनतेशी संवादही साधला.
‘भाजप हटवा, देश वाचवा’ अशी घोषणा देऊन अखिलेश यादव म्हणाले, ‘लोकशाही आणि राज्यघटना यांचे संरक्षण करणे, हे सर्व पक्षांसमोरील मोठे आव्हान आहे. भाजपने धुळीला मिळवलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न इंडिया आघाडीला पूर्ण करायचे आहे. यावेळी राहुल गांधी यांनीही भाषण केले. ते म्हणाले, ‘कन्याकुमारी ते काश्मीर या यात्रेवेळी एकाने मला सांगितले होते की, तुम्ही द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान सुरू करत आहात. अखिलेश यादव आणि प्रियंका गांधी यांच्याबरोबरीने यावेळीही मला तेच करायचे आहे.’
प्रियंका गांधींचाही सहभाग
अलिगड येथे काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेत सहभाग घेतला. भाजपवर टीका करताना त्या म्हणाल्या, ‘युवक, पोलीस आणि विद्यार्थी यांच्याशी भाजपचा संपर्क तुटत चालला आहे. देशात बेरोजगारी, महागाईचा प्रश्न आ वासून उभा आहे. देशात अनेक मोठ्या परिषदा झाल्या त्यामुळे भारताचा जगभरात आदर वाढला, हे आम्हालाही मान्य आहे. मात्र, युवक, पोलीस आणि विद्यार्थ्यांच्या सन्मानाचा आणि देशाचा काही संबंध नाही का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.