सर्मा म्हणाले, आता कोर्टात भेटू!
#नवी दिल्ली
उद्योजक गौतम अदानी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या नव्या ट्विटमुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी राहुल यांच्यावर जोदार टीका केली आहे. राहुल यांच्या नव्या ट्विटमध्ये काँग्रेस सोडून गेलेले गुलाम नबी आझाद, ज्योतीरादित्य सिंदीया, हिमांता बिस्वा सर्मा, किरणकुमार रेड्डी आणि अनिल के. ॲन्टोनी यांच्या नावाचा उल्लेख केला असून त्याच अनुषंगाने अदानींच्या बेनामी कंपनीत गुंतवलेले २० हजार कोटी कोणाचे, हा प्रश्न पुन्हा विचारला आहे.
काँग्रेस पक्ष सोडून गेलेले नेते आणि उद्योजक गौतम अदानी यांच्यातील संबंधांचा अप्रत्यक्ष संबंध जोडणाऱ्या राहुल यांच्या ट्विटमुळे तर आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सर्मा प्रचंड संतापले आहेत. ते म्हणतात की, बोफोर्स प्रकरण आणि नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी आम्ही आपणाला प्रश्न विचारले नाहीत, ही आमची सभ्यता आहे. बोफोर्स आणि हेरॉल्ड प्रकरणातील फौजदारी कारवाई आपण कशी लपवली हा प्रश्न आम्ही कधी विचारला नाही. बोफोर्स प्रकरणाशी संबंध असलेले इटालियन उद्योजक ओटाव्हिओ क्वात्रोची यांना भारतीय न्यायव्यवस्थेपासून पलायन करण्यास तुम्ही कशी परवानगी दिली? ते आता राहू द्या. आता आपण कोर्टातच भेटू.
आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सर्मा यांनी २०१५ मध्ये काँग्रेस पक्षाचा त्याग करून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. अदानी प्रकरणी हिंडेनबर्ग अहवाल आल्यापासून अदानी समूहाचे समभाग घसरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अब्जाधीश उद्योजक गौतम अदानी यांच्यातील संबंधांवरून सतत प्रश्न उपस्थित करत भाजपची राजकीय कोंडी करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. बदनामी प्रकरणी संसद सदस्यत्व रद्द झाल्यापासून राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणाचा पाठपुरावा कायम करत राहू असे स्पष्ट केले होते. शेल कंपन्यांच्या माध्यमातून २० हजार कोटींची रक्कम अदानी समूहात कोणी गुंतवली आणि मोदी-अदानी यांच्यात कोणते संबंध आहेत याची माहिती जनतेला हवी असल्याचे राहुल यांनी सतत स्पष्ट केले आहे. गेल्या महिन्यात राहुल एका निवेदनात म्हणाले होते की, अदानी प्रकरणी माझ्या पुढील भाषणात मी कोणती माहिती देणार आहे, याची पंतप्रधान मोदी यांना भीती वाटत असल्याने माझे संसद सदस्यत्व रद्द केले गेले. अदानी आणि मोदी यांच्यात जवळचे संबंध असून ते उघड होऊ नयेत ही त्यांची इच्छा आहे.