संघाला इतिहासाची नेहमीच भीती वाटते
#थिरुअनंतपूरम
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रीसर्च ॲण्ड ट्रेनिंग (एनसीईआरटी) ने अभ्यासक्रमातील मुघल इतिहासाचे धडे वगळल्याबद्दल केरळचे मुख्यमंत्री पिनारी विजयन यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली असून अशा प्रकारच्या घटनांतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इतिहासाबाबतची भीती दिसते असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, एनसीईआरटीने अभ्यासक्रमातून मुघल इतिहासाचे धडे वगळले नसल्याचा खुलासा केला आहे. असे असले तरी अभ्यासक्रमातील बदलाबद्दल भाजपवर विरोधी पक्षातून होणारी टीका कायम आहे.
विजयन ट्विटमध्ये म्हणतात की, आपले खरे रूप उघड होईल या भीतीमुळे संघ परिवाराला इतिहासाबद्दल नेहमी भीती वाटत आली आहे. त्यामुळे त्यांना इतिहासाचे फेरलेखन करायचे असून हा इतिहास सत्यापासून दूरचा असणार आहे, असत्य गोष्टींनी भरलेला असणार आहे. त्यामुळे एनसीईआरटीने अभ्यासक्रमातील काही भाग वगळण्याचा घेतलेला निर्णय निषेधार्ह आहे. याबद्दल भाजपचा आम्ही तीव्र निषेध करतो.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आणि उत्तर प्रदेश शिक्षण मंडळाच्या अकरावीच्या जागतिक इतिहासावरील पुस्तकातील आणि बारावीच्या भारताचा इतिसाह- भाग दोन या पुस्तकातील मुघल इतिहासाचे धडे वगळण्याचा निर्णय एनसीईआरटीने घेतल्याचे वृत्त दोन एप्रिलला प्रसिद्ध झाले होते. या निर्णयावर सगळ्या विरोधी पक्षांनी सडकून टीका केली होती. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करताना माजी मंत्री कपील सिब्बल म्हणाले होते की, आधुनिक भारताचा इतिहास तर २०१४ पासून म्हणजे मोदींच्या कारकिर्दीला सुरुवात झाल्यापासून होते. दरम्यान एनसीईआरटीचे प्रमुख दिनेश साकलानी यांनी इतिहासाच्या अभ्यासक्रमातून मुघल इतिहासावरील धडे वगळण्यात आले नसल्याचा खुलासा केला. अभ्यासक्रमात हे धडे अद्याप असून याबाबतचा वाद अनावश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.