पॅलेस्टाईनच्या पंतप्रधानांचा राजीनामा

गाझा पट्टीवरील हल्ले, वेस्ट बँक आणि जेरुसलेममधील तणावाच्या पार्श्वभूमीवर दिला राष्ट्राध्यक्षांकडे राजीनामा

ResignationofthePrimeMinisterofPalestine

पॅलेस्टाईनच्या पंतप्रधानांचा राजीनामा

#जेरुसलेम 

पॅलेस्टाईनचे पंतप्रधान मोहम्मद शतायेह यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. कतारच्या अल जजिराने दिलेल्या वृत्तानुसार गाझा पट्टीवर होणारे हल्ले, वेस्ट बँक आणि जेरुसलेममधील तणावाची परिस्थिती पाहून शतायेह यांनी राष्ट्राध्यक्ष मेहमूद अब्बास यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला आहे. मोहम्मद शतायेह यांनी पॅलेस्टाईनचे पंतप्रधान असताना गाझाला 'ब्लड व्हॅली' असे नाव दिले होते. ७ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या इस्राएलच्या हल्ल्यांमुळे गाझामध्ये मृतदेह पुरण्यासाठी जागा उरली नसल्याचा दावा त्यांनी केला होता.

पंतप्रधान मोहम्मद शतायेह म्हणाले की, आपले सरकार राजीनामा देत आहे. आपल्या सरकारचा राजीनामा स्वीकारायचा की नाही यांचा निर्णय राष्ट्राध्यक्ष मेहमूद अब्बास यांनी घ्यावयाचा आहे. वास्तविक, पॅलेस्टाईनचे अध्यक्ष हे राज्याचे प्रमुख आहेत. वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेममध्ये राष्ट्रपती लोकशाही पद्धतीने निवडले जातात. सध्याचे अध्यक्ष मेहमूद अब्बास आहेत. २००५ पासून ते पॅलेस्टाईनचे नेतृत्व करत आहेत. राष्ट्रपती पंतप्रधानांची नियुक्ती करतात. ज्याची निवड केली जाते तो सरकार स्थापन करण्यासाठी जबाबदार असतो. राष्ट्रपतींच्या इच्छेनुसार पंतप्रधानांची नियुक्ती केली जाते. त्यासाठी संसदेची मंजुरी आवश्यक असते.

पॅलेस्टाईन प्राधिकरण म्हणून ओळखला जाणारा भाग हा पॅलोस्टिनींच्या ताब्यात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पॅलेस्टिनी प्रदेशांची प्रशासकीय संस्था म्हणून ती ओळखली जाते. पॅलेस्टाईन प्राधिकरणाचे नेतृत्व पॅलेस्टिनी अध्यक्ष करतात आणि पॅलेस्टाईनची विधान परिषद लोकप्रतिनिधींची सभा आहे. पॅलेस्टाईनमध्ये दोन मोठे राजकीय पक्ष आहेत. यातील एक हमास असून दुसरा पक्ष फतेह हा आहे. हमास ही एक सशस्त्र संघटना आहे. २००७ पासून गाझा पट्टीवर ती राज्य करत आहे. त्याच वेळी, फतेहच्या नेतृत्वाखालील पॅलेस्टाईन प्राधिकरण, वेस्ट बँक आणि जेरुसलेमवर राज्य करते. त्यांना आंतरराष्ट्रीय समर्थन मिळालेले आहे.

पॅलेस्टाईन प्राधिकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर पॅलेस्टिनी लोकांचे प्रतिनिधित्व करते. पॅलेस्टाईनमधील राजकीय व्यवस्था पॅलेस्टिनी प्राधिकरणाच्या  नियमानुसार चालते. पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन आणि इस्राएलमधील ओस्लो करारानंतर पॅलेस्टाईन प्राधिकरणाची स्थापना झाली. १९९४ मध्ये अंतरिम प्रशासकीय संस्था म्हणून तिची निवड करण्यात आली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest