अतिवृष्टीमुळे यमुनेच्या पातळीत विक्रमी वाढ
#नवी दिल्ली
उत्तर भारतात सध्या प्रलयकारी पाऊस सुरु असून युमना नदीच्या पाणी पातळीत विक्रमी वाढ झाली आहे. सध्या या नदीची पाणी पातळी पहिल्यांदाच २०७.५५ मीटरवर पोहोचली आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे मदतीसाठी धाव घेतली असून केंद्र सरकारने या प्रश्नाकडे लक्ष घालावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.
यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, यामध्ये अनेक भाग अक्षरशः बुडून गेले आहेत. या भागांमध्ये लहान मुले गळ्यापर्यंत आलेल्या पाण्यातून दुकानातून दूध इतर वस्तू आणतानाचे व्हीडीओ समोर आले आहेत. त्याचबरोबर गल्ल्या-गल्यांमध्ये लोक या पाण्यात पोहताना दिसत आहेत. काही रहिवासी भागांमध्ये पाणी शिरल्याने लोक अक्षरशः छोट्या होड्यांतून प्रवास करत आहेत. सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी डोक्यावरुन मोठ्या प्रमाणावर सामान वाहतूक करताना दिसत आहेत.
यमुना नदीने मोडला ४५ वर्षांचा विक्रम
दरम्यान, हवामाना खात्याने इथे १४ ते १६ जुलै दरम्यान आणखी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे पुराचा धोका आणखी वाढू शकतो. यमुना नदीची पाणीपातळी बुधवारी सकाळी ९ वाजता २०७.३२ मीटर इतकी नोंदवली गेली. ही पातळी दुपारी एक वाजता वाढून २०७.५५ मीटरवर पोहोचली. सकाळी झालेली नोंद हा यमुना नदीच्या पाणीपातळीचा १० वर्षातील रेकॉर्ड आहे. त्यानंतर दुपारच्या पातळीने तर ४५ वर्षातला विक्रम मोडीत काढला आहे. ६ सप्टेंबर १९७८ रोजी दिल्लीतील यमुना नदीची पाणी पातळी प्रचंड २०७.४९ मीटर इतकी नोंदवण्यात आली होती.