कर्नाटकात बंडखोरीला आले उधाण
#बंगळुरू
तिकिटासाठी भाजपच्या अनेक नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर काँग्रेसमधील काही नेत्यांनी तिकीट नाकारल्यामुळे पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करत तिकीटही मिळवले आहे. कर्नाटकातील सुमारे ३५ टक्के जागांवर सगळ्या पक्षाचे बंडखोर निवडणूक लढवत असल्याचे समोर आले आहे. सत्ताधारी भाजप, काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) या तीन प्रमुख पक्षांत लढत होणार असल्याचे सांगितले जात आहे.
भाजप आणि काँग्रेसने कर्नाटकमधील त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आणि या बंडखोरीला उधाण आले. तिकीट न मिळालेल्या उमेदवारांनी पक्षाविरोधात बंडखोरी सुरू केली आहे. यापूर्वी हा बंडखोरीचा सूर भारतीय जनता पक्षात दिसत होता. आता काँग्रेसमध्येही अशीच स्थिती पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे माजी खासदार बी.व्ही. नायक यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांना देवदुर्ग विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यास पक्षाने
नकार दिला. नायक यांच्या जागी त्यांच्या भावाच्या पत्नीला तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे नायक यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. राजीनाम्यानंतर नायक म्हणाले, पक्षाने माझ्याकडे वारंवार दुर्लक्ष केले. मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा विचार करत आहे. त्यांनी मला मानवी मतदारसंघातून विधानसभेचे तिकीट देण्याचे आश्वासन दिले आहे. याआधी मी काँग्रेसचा माजी खासदार होतो. मी तीन मतदारसंघातून तिकिटासाठी अर्ज केला होता. काँग्रेस पक्षात माझे वडील ४ वेळा आमदार होते, मी एकेकाळचा खासदार होतो. पक्षाच्या सेवेत माझ्या कुटुंबाचे मोठे योगदान असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
वृत्तसंस्था