राहुल यांची सामान हलवण्यास सुरुवात
#नवी दिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी १२, तुघलक रेसिडेन्सी हे सरकारी निवासस्थान खाली करण्यास शुक्रवारी प्रारंभ केला. सुरत न्यायालयाने बदनामीच्या खटल्यात त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे त्यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना खासदार म्हणून मिळालेले सरकारी निवासस्थान २२ एप्रिलपर्यंत खाली करण्यास सांगण्यात आले होते. याचा संदर्भ देत काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना खोचक टोला लगावला आहे.
शुक्रवारी सकाळी राहुल यांच्या १२ तुघलक रोड या निवासस्थानी दोन ट्रक येऊन दाखल झाले. येथील त्यांचे साहित्य हे त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांच्या १० जनपथ रेसिडेन्सी येथे हलविण्यात आले. गुलाम नबी आझाद यांचे राज्यसभा सदस्यत्व संपल्यानंतरही त्यांनी आपले सरकारी निवासस्थान खाली केलेले नाही. त्याचा संदर्भ देऊन खेरा यांनी आझाद यांना लक्ष्य केले आहे. सरकारी निवासस्थानावरून काँग्रेस नेते आझाद यांना सतत लक्ष्य करत आहेत. या आठवड्याच्या प्रारंभी आझाद यांना सरकारी निवासस्थानी राहण्यास सरकारने कशी परवानगी दिली, असा प्रश्न केला होता. खेरा म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून राज्यपाल राहिलेले सत्यपाल मलिक भाजपवर सतत टीका करत आहेत. त्यामुळे विनंती करूनही त्यांना माजी राज्यपाल म्हणून झेड प्लस सुरक्षा पुरवली जात नाही. तसेच ते सध्या त्यांच्या स्वत:च्या घरात राहात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यसभा सदस्य नसतानाही आझाद अजूनही सरकारी निवासस्थानी राहात असून त्यांना मात्र झेड प्लस सुरक्षा दिली आहे. वृत्तसंस्था